Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी अठरा हजार रुपयांचा लाभ दिला जातोय. हे पैसे एकाच वेळी मिळत नाहीत तर पंधराशे रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वाटप केले जात आहे.
दरम्यान आता याच योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. खरंतर, या योजनेचे आतापर्यंत एकूण 15 हफ्ते देण्यात आले आहेत. पण, ही राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेली आणि टीका झालेली योजना. या योजनेवरुन सतत विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा सामना पाहायला मिळतो.

सुरुवातीला विरोधकांनी ही योजना निवडणुकीनंतर लगेच बंद होईल असा आरोप केला. या योजनेसाठी सरकार इतर विभागाकडून पैसा अड्जस्ट करतोय यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली.
तर दुसरीकडे या योजनेसाठी पुढील पाच वर्षांसाठीचा निधी सरकारने आधीच उपलब्ध करून ठेवलेला आहे आणि ही योजना कधीच बंद होणार नाही, उलट निधी वाढत राहणार असा युक्तिवाद सरकारकडून केला जातोय.
पण या योजनेत काही गैरप्रकार सुद्धा उघडकीस आले आहेत. याचा अनेक पुरुषांनी लाभ घेतला अशा बातम्या समोर आल्या आहेत. दरम्यान अशा अपात्रांवर सरकारकडून कठोर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे.
या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या काळातील पैसे मिळाले आहेत. आता ऑक्टोबर महिन्याचा पैसा आजपासून म्हणजेच मंगळवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर चा हप्ता चार नोव्हेंबर 2025 पासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातून वर्ग करण्यास सुरुवात होणार असून पुढील दोन-तीन दिवसांमध्ये या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर चा हप्ता मिळणार अशी माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दिली आहे.
मध्यंतरी अनेक ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये एकाच वेळी जमा केले जातील असा दावा करण्यात आला होता. पण, प्रत्यक्षात सरकारने फक्त ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणास मंजुरी दिली आहे. म्हणजे महिलांना फक्त ऑक्टोबर महिन्याचाचं लाभ दिला जाणार आहे.













