Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन आता पूर्णपणे तयार झाले आहे आणि लवकरच ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची बातमी समोर येत आहे. खरंतर सध्याची वंदे भारत चेअर कार प्रकारातील आहे. पण आता याचे स्लीपर व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस देशातील ज्या मार्गांवर सुरू आहे तिथे त्या गाडीला चांगला प्रतिसाद मिळतोय. या गाडीमुळे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट झालाय. मात्र ही गाडी लांब पल्याच्या रूटवर चालवता येणे शक्य होते. यामुळे आता रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाडीबाबत वेळोवेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी अलीकडेच ही गाडी लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असे वक्तव्य केले होते. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन यशस्वी चाचणीनंतर रुळावर धावण्यास सज्ज झाली आहे.
तसेच दुसरी गाडी देखील लवकरच रुळावर धावण्यास सज्ज होणार आहे आणि दुसरी गाडी परिपूर्ण रुळावर धावण्यास तयार झाल्यानंतर प्रत्यक्षात वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी पहिल्यांदा कोणत्या रूटवर धावू शकते या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
कोणत्या मार्गावर धावणार स्लीपर ट्रेन
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन देशातील दिल्ली ते पटना यादरम्यान चालवली जाणार आहे. या संदर्भात अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट मध्ये ही गाडी दिल्ली आणि पटनादरम्यान चालवली जाईल असा दावा केला जातोय.
देशातील हा एक व्यस्त रेल्वे मार्ग आहे आणि यावर प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. यामुळे या मार्गावर ही गाडी सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. या गाडीत एकूण 16 डब्बे राहणार आहेत आणि 1128 प्रवासी प्रवास करू शकतील. या गाडीचा कमाल वेग 180 किलोमीटर प्रतितास इतका राहील.
ऑटोमॅटिक अनाउन्समेंट, विज्युअल सिस्टम, सेक्युरिटी कॅमेरे, मॉड्युलर पॅन्ट्री असे फीचर्स सुद्धा यात असणार आहेत. सीट्सवर रीडिंग लाईट, यूएसबी चार्जिंग पोर्ट, दिव्यांगांसाठी अनुकूल बर्थ आणि टॉयलेट सुद्धा असतील. हे फीचर्स या गाडीला देशातील सर्वाधिक आधुनिक ट्रेन बनवतील.













