Property Rights : आपल्याकडे मालमत्तेवरून नेहमीच मोठमोठे वादविवाद होत असतात. संपत्ती विषयक कायद्याबाबत फारसे ज्ञान नसल्याने सर्वसामान्य कुटुंबात संपत्ती वरून वाद-विवाद होणे हे स्वाभाविकच आहे.
दरम्यान आज आपण संपत्ती वरून होणाऱ्या वाद विवादांपैकी एका महत्त्वाच्या बाबी बाबत चर्चा करणार आहोत. खरंतर अनेकांच्या माध्यमातून विधवा सून आपल्या सासू-सासऱ्यांच्या संपत्तीवर दावा करू शकते का असा प्रश्न उपस्थित करताना दिसतात.

सासू-सासर्यांच्या नावावर असणाऱ्या त्यांनी कमावलेल्या स्वकष्टार्जीत संपत्तीवर विधवा सुनेचा अधिकार नेमका किती? हा प्रश्न उपस्थित होणे फारच स्वाभाविक आहे. दरम्यान आता आपण याबाबत कायदे तज्ञ नेमके काय सांगतात याविषयीची माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कायदा काय सांगतो?
भारतीय कायद्यानुसार, जर संपत्ती वडीलोपार्जित नसेल म्हणजेच स्वकष्टाने मिळवलेली असेल तर त्या मालमत्तेवर मालकाचा पूर्ण अधिकार असतो. अशा संपत्तीवर इतर कुणालाही अधिकार राहत नाही.
पत्नी, मुलगा, मुलगी, सून किंवा जावई यांना अशी संपत्तीच्या मालकाच्या हयातीमध्ये कोणताही कायदेशीर हक्क मिळतं नसतो. म्हणजेच जर सासर्याच्या नावावर असणारी प्रॉपर्टी ही स्वकष्टाने मिळवलेली असेल तर अशा प्रकरणांमध्ये विधवा सुनेला कोणताच हक्क मिळू शकत नाही.
खरेतर, अलीकडे सून किंवा जावयाला सासरे-सासूबाईंच्या मालमत्तेत हक्क आहे का ? हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. कायद्याच्या दृष्टीने पाहता, एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःच्या उत्पन्नातून, बक्षीस, परिश्रम किंवा वैयक्तिक गुंतवणुकीतून विकत घेतलेली संपत्ती होय.
या संपत्तीचा उपभोग घ्यायचा, ती विकायची, दान करायची किंवा कोणाला तरी वसीयत करून द्यायची हा पूर्ण निर्णय त्या व्यक्तीचाचं असतो. त्यामुळे सासऱ्यांची मिळकत स्वकष्टार्जित असल्यास त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या पत्नीला, मुलांना किंवा सून-जावयाला कोणताही मालकी हक्क मिळत नाही.
आता अशी संपत्ती कधीच इतरांना मिळत नाही का? तर असे पण नाही. जेव्हा सासऱ्यांचे निधन होईल तेव्हा या संपत्तीचे रीतसर वाटप होण्याची शक्यता असते. सासऱ्याच्या निधनानंतर अशा संपत्तीचे वाटप नेमके कसे होईल याबाबत माहिती पाहुयात.
सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी मृत्युपत्र करून ठेवलेले नसेल, तर हिंदू वारसा कायद्याच्या कलम 8 नुसार त्यांच्या क्लास 1 वारसांना समान हक्क मिळतो. या वारसांमध्ये विधवा पत्नी, मुलगा, मुलगी, आई (हयात असल्यास), मयत मुलगा-मुलीची संतती (नातवंडे) आणि मुलाची विधवा पत्नी (सून) यांचा समावेश होतो.
या सर्वांना संपत्तीवर समान प्रमाणात हक्क प्राप्त होत असतो. थोडक्यात विधवा सुनेला सासरा हयात असेपर्यंत त्यांच्या संपत्तीतून एक कवडी सुद्धा मिळू शकत नाही.
पण जेव्हा सासरा मरण पावेल आणि जर सासऱ्याने मृत्युपत्र बनवलेले नसेल तर अशा प्रकरणांमध्ये विधवा सुनेला तिच्या सासऱ्याच्या क्लास वन वारसदारांप्रमाणे समान अधिकार दिला जाणार आहे.