Mumbai Expressway News : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात रस्ते विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमध्ये देखील रस्त्यांचे कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि यामुळे दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे.
अशातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई यामुळे नक्कीच लाभान्वित होणार आहे.

विशेष म्हणजे हा महामार्ग फक्त मुंबईसाठीच नाही तर मुंबई नजीकच्या तीन जिल्ह्यांमधील नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक अशी या प्रस्तावित महामार्ग प्रकल्पाची ओळख बनलेली आहे.
हो, विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर याच प्रकल्पाबाबत आम्ही बोलत आहोत. खरेतर आता या प्रकल्पाला पुन्हा नवीन उभारी मिळाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याला (नवघर ते बालवली, 96.4 किमी) मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा फारच महत्त्वाचा असून हा टप्पा बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारला जाणार आहे.
या प्रकल्पासाठी हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (HUDCO) कडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाबाबत पण फडणवीस सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. कर्जासाठी राज्य सरकार स्वतः हमीदार बनणार आहे. या टप्प्यासाठी एकूण 37,013 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्यापैकी 22,250 कोटी रुपये एवढी रक्कम भूमी अधिग्रहणासाठी आणि 14,763 कोटी रुपये रक्कम व्याजासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षी EPC (इंजिनियरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन) मॉडेलवर निविदा मागवण्यात आल्या होत्या.
मात्र, कंत्राटदारांनी सादर केलेल्या बोली MSRDC च्या अंदाजापेक्षा अधिक असल्याने चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता हा प्रकल्प BOT पद्धतीवर पुन्हा हाती घेतला जात आहे आणि लवकरच नव्या निविदा प्रक्रिया सुरू होणार आहेत.
भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सध्या सुरू असून, अतिरिक्त निधी मंजूर झाल्यामुळे या कामाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. हा कॉरिडॉर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना जोडणारा असेल.
यामुळे MMR क्षेत्रातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. विशेष म्हणजे, पॅकेज-6 या टप्प्याचे महत्त्व सर्वाधिक आहे कारण यातून दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या JNPT स्परचा संपर्क मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेशी जोडला जाणार आहे.
त्यामुळे औद्योगिक वाहतूक, लॉजिस्टिक नेटवर्क आणि मुंबईच्या बाहेरील उपनगरांमधील संपर्क अधिक सक्षम होणार आहे. राज्य सरकारचा दावा आहे की, या प्रकल्पामुळे प्रादेशिक विकासाला गती, रोजगारनिर्मिती आणि वाहतुकीतील कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.