Solapur News : पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की, पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा वंदे भारत एक्सप्रेसच्या नकाशावर येणार आहे.
जिल्ह्याला आणखी एका वंदे भारतची भेट मिळणार असल्याची खात्रीशीर बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते मराठवाड्यातील नांदेड यादरम्यान येत्या काळात वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे.

ही गाडी 2025 च्या अखेरीस सुरू होईल अशी शक्यता असून या गाडीला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मिळणार असल्याचा दावा आता केला जातोय.
असे झाले तर सोलापूर जिल्ह्याला मिळणारी ही आणखी एक वंदे भारत ट्रेन राहणार असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेससाठी नुकताच सर्व्हे करण्यात आला होता.
यामुळे लवकरच ही वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारी 2026 पर्यंत ही वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे.
या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात येणार असून यामुळे पुण्याकडे जाण्यासाठी आणखी एक हाय स्पीड ट्रेन उपलब्ध होणार आहे.
नांदेड ते पुणे या रेल्वे मार्गाचे अंतर 550 किलोमीटर इतके असून या प्रवासासाठी सध्या ज्या एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत त्यांना दहा ते बारा तासांचा कालावधी खर्च करावा लागतो पण जेव्हा वंदे भारत ट्रेन सुरू होईल तेव्हा हा प्रवास कालावधी सात तासांवर येणार आहे.
म्हणजेच प्रवाशांचा जवळपास पाच तासांचा वेळ वाचेल. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना नांदेडला जाण्यासाठी सध्या पनवेल नांदेड ही एकच गाडी उपलब्ध आहे पण ही वंदे भारत ट्रेन सुरू झाली की प्रवाशांना नांदेड ला जाण्यासाठी आणखी एक ट्रेन उपलब्ध होईल.
दरम्यान पुणे – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावरील लातूर, धाराशिव, कुर्डुवाडी, दौंड या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.
या वंदे भारतला कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाला असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांकडून आनंद व्यक्त केला जातो पण बार्शीला सुद्धा ही गाडी थांबायला हवी अशी आग्रही मागणी देखील प्रवासी संघटनांकडून उपस्थित होत आहे.
पुणे – नांदेड वंदे भारत सुरू होणार अशा चर्चा आहेत पण अद्याप रेल्वे कडून या संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन निघालेले नाही.