Maharashtra Vande Bharat Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांना लवकरच आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा सर्वे सुद्धा नुकताच पूर्ण झाला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सद्यस्थितीला महाराष्ट्रात एकूण बारा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. दरम्यान आता राज्याला तेरावी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ही गाडी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन महत्त्वाच्या विभागांना कनेक्टिव्हिटी पुरवणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की सद्यस्थितीला राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, CSMT ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते पुणे, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
दरम्यान, आता राज्याला 13 व्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. ही गाडी पुणे ते नांदेड या मार्गावर चालवण्यात येईल. यामुळे पुणे ते नांदेड हा प्रवास वेगवान होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुण्याला मिळणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन राहणार आहे.
शिवाय सीएसएमटी ते सोलापूर या मार्गावर चालवण्यात येणारी वंदे भारत ट्रेन सुद्धा पुण्या मार्गे धावत असल्याने पुण्यातील वंदे भारतचे नेटवर्क मोठे विस्तारले जाणार आहे. दरम्यान आता आपण पुणे नांदेड या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
केव्हा सुरू होणार नवीन वंदे भारत
पुणे – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर मार्गे चालवली जाणार आहे. यामुळे या गाडीचा सोलापूर वासियांना मोठा लाभ मिळेल अशी आशा आहे. पुण्याला आणि नांदेडला जाण्यासाठी सोलापूर वासियांना नव्या गाडीची उपलब्धता होणार आहे आणि यामुळे सोलापूरकरांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
ही प्रस्तावित वंदे भारत डिसेंबर 2025 अखेर किंवा जानेवारी 2026 मध्ये प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या गाडीला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात येणार आहे.
यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना ही गाडी मोठी फायद्याची ठरणार आहे. ही ट्रेन मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याकडे जाण्यासाठी सोयीची ठरेल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केलाय.
पुणे ते नांदेड हे 550 km चे अंतर आहे आणि सध्या ज्या एक्सप्रेस सुरू आहेत त्या गाड्या हे अंतर बारा तासात पूर्ण करतात. पण जेव्हा वंदे भारत ट्रेन सुरू होईल तेव्हा हे अंतर सात तासांमध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजेच प्रवाशांचा पाच तासांचा वेळ वाचणार आहे.
या गाडीमुळे बार्शी, माढा, पंढरपूर, करमाळा या भागातून प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे. ही प्रस्तावित वंदे भारत ट्रेन पुणे, कुर्डूवाडी, धाराशिव आणि नांदेड या महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा घेणार आहे.
या गाडीचे तिकीट दर हे साधारणतः 1200 रुपयांपासून सुरू होईल आणि कमाल 2500 रुपयांपर्यंत जाऊ शकते. पण, अद्याप ही गाडी कधी सुरू होणार, याचे तिकीट दर काय असणार यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.