Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला भविष्यात 42,000,00,00,000 रुपयांचा आणखी एक महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांत राज्यातील दळणवळण व्यवस्था फारच मजबूत झाली आहे. महाराष्ट्रात सगळीकडे रस्ते विकासाच्या मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत.
अलीकडेच राज्याला मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाची भेट मिळाली होती. तसेच राज्य शासनाने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला देखील नुकतीच मंजुरी दिली आहे. दुसरीकडे आता केंद्र शासनाच्या माध्यमातून पुणे ते बेंगलोर दरम्यान नवीन ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे विकसित करण्यात येणार आहे.

सध्याच्या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पुणे बेंगलोर प्रवास वेगवान व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भातील प्रस्ताव देखील रेडी झाला असून हा प्रस्ताव अधिकृत मंजुरीसाठी केंद्रातील सरकारकडे सादर झाला असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
खरे तर या प्रकल्पाची घोषणा स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे यामुळे या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून लवकरच मंजुरी मिळणार अशी आशा आहे.
या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे नुकताच सादर झाला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याने आज आपण या प्रकल्पाबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे ते बेंगलोर हा महामार्ग नेमका कसा आहे, याचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांना लाभ होणार, या नव्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे चा रूट कसा आहे याबाबत आता आपण थोडक्यात माहिती पाहूयात.
कसा आहे प्रकल्प?
प्रस्तावित पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे 699 किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याची महाराष्ट्रातील लांबी 206 किलोमीटर इतकी आहे. याचा डीपीआर नुकताच तयार झाला असून केंद्राच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
या डीपीआर अनुसार हा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 42000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग प्रकल्प सहा लेनचा राहणार आहे. यामुळे पुणे बेंगलोर हा प्रवास वेगवान होईल. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याचे काम मंजुरीनंतर तीन वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले आहे.
सध्याच्या महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येतोय आणि यामुळे नव्या महामार्गाची गरज भासली असल्याने हा नवीन ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित केल्या जाणाऱ्या वर्तुळाकार मार्गावरील खोपी येथून या नव्या रस्त्याची सुरुवात होणार आहे.
पुणे ते बंगळुर या महामार्ग प्रकल्पात पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावरील उर्से ते सातारा रस्त्यावरील केळवडे हा पुणे रिंग रोडचा भाग सुद्धा समाविष्ट आहे. पण या भागाचे काम MSRDC करणार आहे.
खरेतर, हा रिंग रोडचा टप्पा पुणे ते बंगळुर या नवीन ग्रीनफिल्ड महामार्गाचा भाग करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार अशी माहिती दिली जात आहे.