कोणत्या राज्यात किती किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू आहेत ? महाराष्ट्राची स्थिती कशी आहे ? वाचा सविस्तर

Maharashtra Metro News : भारताच्या शहरी विकासात मेट्रो रेल्वेने गेल्या काही वर्षांत क्रांती घडवली आहे. ‘इन्फ्रा न्यूज इंडिया’च्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील १३ राज्यांतील १९ शहरांमध्ये एकूण १००८.२६ किमी मेट्रो नेटवर्क कार्यान्वित आहे. यामध्ये सर्वाधिक लांबीचे मेट्रो नेटवर्क दिल्लीमध्ये ३५३.२ किमी आहे.

त्यानंतर महाराष्ट्र (१६२.७२ किमी), कर्नाटक (९६.१ किमी), पश्चिम बंगाल (७३.८९ किमी) आणि उत्तर प्रदेश (७२.८२ किमी) यांचा क्रम लागतो. राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्रातील एकूण चार शहरात मेट्रो कार्यरत आहे.

मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे या शहरांमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शहरांमधील मेट्रोचा विस्तारही सुरू आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये विस्तारित मेट्रो मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

विशेष म्हणजे येत्या काळात नाशिक सारख्या शहरातही आपल्याला मेट्रो धावताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातही लखनऊ, नोएडा, गाझियाबाद आणि कानपूर येथे मेट्रो सेवा उपलब्ध आहे.

या मेट्रो सेवेमुळे शहरी भागांतील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच, पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. दरम्यान, पुढील सहा महिन्यांत देशातील विविध शहरांमध्ये सुमारे १० नवीन मेट्रो कॉरिडॉर सुरू होणार अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या नव्या मार्गांमुळे भारतातील मेट्रो नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.

यात पुणे मेट्रो टप्पा-२, चेन्नई मेट्रो विस्तार, अहमदाबाद मेट्रो फेज-२, भोपाळ आणि इंदौर मेट्रो यांचा समावेश राहणार असा अंदाज दिला जातोय. तसेच हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर भारतातील एकूण कार्यरत मेट्रो नेटवर्कची लांबी ११०० किमी पेक्षा जास्त होणार अशी शक्यता आहे.

भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मेट्रो रेल्वे ही केवळ राजधानी किंवा मोठ्या शहरांचीच नव्हे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांचीही गरज बनत चालली आहे. आता येत्या काही वर्षांत देशातील शहरी वाहतुकीचा चेहरामोहरा मेट्रो रेल्वेच्या विस्तारामुळे पूर्णपणे बदलणार आहे.