Banking Rules : देशातील सर्वसामान्यांसाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी नव्या वर्षापासून सुरू होणार आहे. आरबीआय सर्वसामान्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.
खरे तर आपल्याला अचानक पैशांची गरज भासली की आपण बँकांचे दरवाजे ठोठावत असतो. बँकेकडून आपल्याला विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध होते. होम लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन, गोल्ड लोन असे असंख्य लोन्स आपल्याला बँकांकडून मिळतात.

यातील गोल्ड लोन बाबत बोलायचं झालं तर बँकांकडे आपण आपले सोने गहाण ठेवून कर्ज घेतो. गोल्ड लोन हे ताबडतोब मंजूर होते. याला जास्त कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. त्यामुळे अनेक जण आपल्याकडे सोने बँकेत गहाण ठेवून कर्ज काढण्यास पसंती दाखवतात.
तुम्ही आतापर्यंत बँकेच्या गोल्ड लोन च्या जाहिराती पाहिल्या असतील पण आता बँकांकडून ग्राहकांना चांदीवर सुद्धा कर्ज दिलं जाणार आहे. म्हणजे बँकेत आपण आपल्याकडील चांदी गहाण ठेवून सुद्धा कर्ज घेऊ शकतो.
अद्याप ही सुविधा उपलब्ध झालेली नाही पण लवकरच या सुविधेचा श्री गणेशा होणार आहे. या सुविधेचा शुभारंभ एप्रिल 2026 पासून केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने चांदीवर लोन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे याबाबतचे सविस्तर परिपत्रक नुकतेच आरबीआयकडून जारी करण्यात आले आहे. हे नवीन नियम एक एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येणार आहेत. म्हणजेच पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना चांदीवर देखील कर्ज मिळणार आहे.
या निर्णयानंतर देशातील सर्व कमर्शिअल बँक, स्मॉल फायनान्स बँक, रिजनल रुरल बँक, अर्बन आणि रुरल को-ऑपरेटिव्ह बँक, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आणि हाऊसिंग फायनान्स कंपनी यांच्याकडून पुढील वर्षापासूनच चांदीवर सुद्धा कर्ज दिले जाणार आहेत.
परंतु दागिने किंवा नाण्याच्या स्वरूपांमध्ये असणाऱ्या चांदीवर तसेच सोन्यावरच कर्ज मिळू शकते. सोने किंवा चांदीचे बिस्कुट असतील तर त्यावर कर्ज मिळणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार चांदीचे दागिने असतील तर जास्तीत जास्त दहा किलो दागिन्यांवर कर्ज मिळणार आहे आणि जर नाणी असतील तर जास्तीत जास्त अर्धा किलो नाण्यांवर कर्ज मिळणार आहे.
विशेष म्हणजे अडीच लाख रुपयांपर्यंतची चांदी गहाण ठेवल्यास गुंतवणूकदारांना 85% कर्ज मिळणार आहे. अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंतची चांदी गहाण ठेवल्यास 80 टक्के कर्ज मिळणार आहे आणि पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असणारी चांदी गहाण ठेवल्यास 75 टक्के कर्ज मिळणार आहे.













