Bajaj Finance Share Market : बजाज फायनान्स मध्ये गुंतवणूक केलेल्या आणि गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. आज मंगळवारी बीएसईवर बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
या शेअर्स मध्ये आज तब्बल 6.9 टक्क्यांची घसरण झालीये आणि शेअरची किंमत 1010.25 रुपयांपर्यंत खाली आली. महत्वाची बाब म्हणजे कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या आपल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालात निव्वळ नफा 22 टक्क्यांनी वाढला असल्याचे जाहीर केले आहे.

खरे तर कंपनीचा निव्वळ नफा वाढलेला असतानाही बजाज फायनान्स च्या शेअर्समध्ये घसरण होत आहे आणि यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. अशातच आता एका टॉप ब्रोकरेज फर्मकडून या शेअर्स साठी निगेटिव्ह रेटिंग दिली आहे.
या कंपनीचे शेअर्स येत्या काळात आणखी घसरू शकतात असा अंदाज ब्रोकरेज कडून देण्यात आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. एनपीए (Non-Performing Assets) वाढ, क्रेडिट कॉस्ट वाढ आणि मार्जिनवरील दबाव या कारणांमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीच्या आर्थिक अहवालानुसार, कर्ज नुकसान व तरतुद (Loan losses & provisions) मागील वर्षीच्या Q2FY25 मधील 1909 कोटींवरून वाढून 2269 कोटींवर गेली आहे. सप्टेंबर 2025 अखेर पर्यंत कंपनीचे ग्रॉस एनपीए 1.24% तर नेट एनपीए 0.60% एवढे होते.
मागील वर्षी हे अनुक्रमे 1.06% आणि 0.46% इतके होते. कंपनीचा स्टेज 3 अॅसेट्सवरील प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो 52% एवढा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान आता आपण दोन प्रमुख ब्रोकरेज फर्मकडून बजाज फायनान्स च्या शेअर साठी काय रेटिंग देण्यात आली आहे याबाबत माहिती पाहूयात.
ब्रोकरेजचा अहवाल काय सांगतो?
ब्रोकरेज हाऊस सीएलएसए (CLSA) ने बजाज फायनान्सवर आपले Outperform रेटिंग कायम ठेवले आहे. या ब्रोकरेज ने बजाज फायनान्स साठी बाराशे रुपयांची टार्गेट प्राईस सेट केली आहे.
अर्थात येत्या काळात या कंपनीचे शेअर्स आणखी वाढतील असा ब्रोकरेजचा अंदाज आहे. पण बर्नस्टीन (Bernstein) ने कंपनीवर Underperform रेटिंग कायम ठेवली आहे. तसेच या कंपनीच्या शेअर 640 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात असा अंदाज देण्यात आला आहे.
या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेजनं सांगितलं की, जरी कंपनीचा नफा आणि कर्ज वाढ मजबूत दिसत असला तरी एनपीए वाढ गंभीर बाब आहे. मोठ्या बँका आणि एनबीएफसींच्या तुलनेत बजाज फायनान्सची अॅसेट क्वालिटी घसरलेली दिसते. यामुळे यासाठी अंडर परफॉर्म रेटिंग देण्यात आली आहे.













