भारतात धुमाकूळ घालणाऱ्या Fortuner ला ‘या’ देशात ग्राहक पण मिळेनात, शेवटी कंपनीने घेतला मोठा निर्णय, आता….

Published on -

Toyota Fortuner News : काळा घोडा, पांढरा हत्ती…..हे शब्द इंस्टाग्रामच्या Reels मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतात, याचे जबरदस्त सिनेमॅटिक व्हिडिओ पाहायला मिळतात. Fortuner म्हणजे रुतबा, वाढीव विषय, अगदीच टॉपचं हत्यार पण थांबा हे हत्यार अन घोडा आपल्याकडे. काही देशात या गाडीला विशेष प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे.

आपल्याकडे धुमाकूळ घालणार हे हत्यार ऑस्ट्रेलियाला चालत नसल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया फॉर्च्यूनरच्या विक्रीचा आलेख सतत खाली चालला आहे. TKM अर्थात टोयोटा किर्लोस्कर मोटर सध्या आपल्या भारतात तिच्या दोन प्रमुख मॉडेल्स, इनोव्हा आणि फॉर्च्युनरमुळे टॉप ब्रॅण्ड बनला आहे.

त्यातल्या त्यात फॉर्च्युनर म्हटलं की वातावरण टाईट. या गाडीमुळे कंपनी एका नव्या उंचीवर पोहोचली आहे आणि भारतात सातत्याने यश मिळवत आहे. त्याचवेळी कंपनीच्या पिकअप हिलक्सने भारतीयांना आपल्याकडे फारसे आकर्षित केलेले दिसत नाही.

पण, ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही डोकावलं तर कहाणी काही औरच आहे. तिथं हिलक्स म्हणजे राडा विषय. कारण ही टोयोटा कार तिथं सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. तर दुसरीकडे तिथं फॉर्च्युनरची विक्री सातत्याने कमी होत आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये फॉर्च्युनर हा फ्लॉप शो राहिलाय.

ही गाडी तिथे एवढी फ्लॉप ठरली आहे की आता कंपनी ऑस्ट्रेलियामध्ये फॉर्च्युनर बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिथं फॉर्च्यूनरची विक्री सतत कमी होत असल्याने आता टोयोटा ऑस्ट्रेलियाने फॉर्च्युनर बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात आपल्याकडे फक्त आणि फक्त शेठ लोक वापरणारी फॉर्च्युनर ऑस्ट्रेलियामध्ये धूळखात पडून असल्याने तिथे बंद होणार आहे. दरम्यान आता आपण ऑस्ट्रेलियामध्ये फॉर्च्यूनरची विक्री कशी सतत कमी होत गेली आहे याची माहिती पाहूयात.

कस आहे विक्रीच गणित

ऑस्ट्रेलियामध्ये फॉर्च्यूनर जवळपास एका दशकाहून अधिक काळापासून उपलब्ध आहे. मागील अकरा वर्षांपासून हे हत्यार ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत ठाण मांडून आहे. पण अलीकडे या गाडीला तिथे फारशी पसंती मिळत नाहीये.

अधिकृत आकडेवारीवर जर नजर टाकली तर ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षाच्या सुरुवातीच्या दहा महिन्यांमध्ये फॉर्च्यूनर चे फक्त 2928 युनिट विकले गेले आहेत. याच काळात तिथे फोर्ड एव्हरेस्टचे 21 हजार 915 युनिट विकले गेलेत.

इसुझू एमयू-एक्सचे पण 12499 युनिट विकले गेलेत. तर टोयोटाच्या लँड क्रूझरचे 23 हजार 298 युनिट विकले गेलेत. यामुळे आता ऑस्ट्रेलियामध्ये फॉर्च्यूनर इतिहास जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टोयोटा ऑस्ट्रेलियाचे विक्री आणि विपणन उपाध्यक्ष शॉन हॅनली यांनी पुष्टी केली की, कंपनी 2026 पर्यंत फॉर्च्युनरला त्यांच्या लाइनअपमधून टप्प्याटप्प्याने काढून टाकणार आहे. आता आपण भारतात स्टेटस सिम्बॉल समजल्या जाणाऱ्या फॉर्च्यूनरची ऑस्ट्रेलियातील किंमत समजून घेऊयात.

फॉर्च्युनरची ऑस्ट्रेलियातील किंमत

ऑस्ट्रेलियामध्ये फॉर्च्युनर बेस मॉडेलची किंमत 59000 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 34 लाख एवढी आहे. तसेच तिथे टॉप मॉडेलची किंमत 72500 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 42 लाख रुपये आहे. तसेच तिथे लँड क्रूझर प्राडोची सुरवातीची किंमत 78 हजार 550 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 46 लाख रुपये आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe