महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी लवकरच पूर्ण होणार ! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ

Published on -

DA Hike : केंद्र सरकारने दिवाळी सणाचे औचित्य साधत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली होती. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून 3 टक्के महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा निर्णय घेतला होता. महत्वाची बाब म्हणजे ही वाढ डीए फरकासह लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना दिलासा मिळाला आहे.

पण महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी अजूनही महागाई भत्ता वाढीचे प्रतीक्षा करत आहेत. केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लागून अपेक्षित आहे. खरेतर याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना 1 जुलै 2025 पासून 58 टक्के डी.ए लागू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्य सरकारकडून अधिकृत आदेश जारी झाल्याने या अधिकाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर वाढीचा लाभ मिळू लागला आहे.

मात्र राज्य शासन सेवेतील इतर सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच राज्य निवृत्त पेन्शनधारकांसाठी अद्याप डी.ए वाढ लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पण आता सरकार यावर सकारात्मक निर्णय घेणार आहे. दिवाळीच्या आधीच याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते मात्र फडणवीस सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही. यामुळे नोव्हेंबर महिन्यात तरी या संदर्भातील निर्णय होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली. पण, या महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्याने निर्णय लांबणीवर गेला आहे.

राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम डिसेंबर 2025 च्या अखेरपर्यंत सुरु राहणार असल्याने आता शासनाची इच्छा असली तरीसुद्धा पुढील दोन महिने म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात याबाबत निर्णय घेता येणार नाहीये. त्यामुळे डीए वाढीसंबंधीचा अधिकृत शासन निर्णय डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजेच निकाल लागल्यानंतरच निर्गमित होण्याची शक्यता आहे. आता, कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा होणारा मुद्दा म्हणजे डीएची थकबाकी मिळणार का ? तर सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर 1 जुलै 2025 पासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. थोडक्यात यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणार असून 58 टक्के दराने वाढीव डी.ए लागू होईल. तसेच महागाई भत्ता वाढीचा फरकही मागील तारखेपासून देण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच एक जुलैपासूनच महागाई भत्ता वाढ लागु राहील आणि जेव्हा हा महागाई भत्ता प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना मिळेल तेव्हा फरकाची रक्कम पण दिली जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News