Pune Railway News : पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरातील रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम आता अंतीम टप्प्यात पोहोचले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हडपसर रेल्वे टर्मिनल वरून पुणे रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या गाड्या देखील सोडण्याचा प्लॅन रेल्वे विभागाने बनवला असल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार येत्या प्रजासत्ताक दिनापासून अर्थात 26 जानेवारी 2026 पासून 2 महत्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांचे प्रस्थान पुणे स्थानकाऐवजी हडपसर टर्मिनलवरून होणार आहे.
यात नांदेड एक्स्प्रेस आणि हरंगुल स्पेशल या गाड्यांचा समावेश आहे. नक्कीच रेल्वेचा हा निर्णय पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यास मदत करणार आहे.
हडपसर टर्मिनलचे काम किती पूर्ण झाले?
मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत हडपसर टर्मिनलचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या हडपसर टर्मिनलवर प्रवासी सुविधा, प्लॅटफॉर्म विस्तार, पार्किंग क्षेत्र, तसेच वाहतूक व्यवस्थापन यांसह विविध सोयीसुविधांचे काम वेगाने सुरू आहे. सध्या येथून 12 नियमित आणि विशेष गाड्या धावतात. विशेष म्हणजे या स्थानकावर 10 गाड्यांना थांबा मंजूर करण्यात आला आहे.
पुणे स्थानकाच्या रिमॉडेलिंगमुळे तिथून सुटणाऱ्या काही गाड्या टप्प्याटप्याने हडपसर आणि खडकी येथे हलविण्याची रेल्वेची योजना आहे आणि या अनुषंगाने आता पुणे ते नांदेड दरम्यान धावणारी एक्सप्रेस गाडी हडपसर रेल्वे स्थानकातून सोडली जाणार आहे आणि पुणे ते हरंगुलदरम्यान धावणारी गाडी सुद्धा हडपसर रेल्वे स्थानकातून सोडली जाणार आहे.
कस असणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार हडपसर–हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस दररोज रात्री 9.50 वाजता प्रस्थान करणार आहे. तसेच हजूर साहिब नांदेड–हडपसर एक्स्प्रेसचे पहाटे 4.35 वाजता आगमन होणार आहे. हडपसर–हरंगुल स्पेशल दररोज सकाळी 6:20 वाजता प्रस्थान करणार आहे. हरंगुल–हडपसर स्पेशलचे रात्री 8.45 वाजता आगमन होणार आहे.













