Electricity Bill : महागाईमुळे सर्वसामान्य जनता प्रचंड भरडली जात आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये महागाईचा दर प्रचंड वाढला आहे आणि यामुळे सर्वसामान्यांची बचत कमी झाली आहे. महिन्याचा पगार हा फक्त घराचा खर्च भागवण्यातच निघून जातो अशी तक्रार अनेकांकडून आपण ऐकलीच असेल.
दरम्यान, वाढत्या लाईटबिलामुळे पण सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस घराचं लाईट बिल वाढतच आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना महिन्याचा खर्च भागवतांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यातल्या त्यात महावितरण विभागाकडून दर महिन्याला मिळणारे लाईट बिल अनेकांना समजत नाही. आपण नेमकी किती वीज वापरली, किती युनिट झाले आणि त्यानुसार बिलाची रक्कम योग्य आहे का, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.
त्यामुळे आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच वीज वापर कसा कमी करायचा, यासाठी कोणत्या टिप्स वापरायला हव्यात ? याबाबतही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
युनिट म्हणजे काय ?
सगळ्यात आधी आपण युनिट म्हणजे काय हे समजून घेऊयात. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, विजेचे एक युनिट म्हणजे 1 किलोवॅट-तास (kWh). म्हणजेच 1,000 वॅटची उपकरणे एक तास चालली, तर एक युनिट वीज खर्च झाली असे समजले जाते.
उदाहरणार्थ, 50 वॅटचा बल्ब 20 तास चालवल्यास त्याचा एक युनिट वापर होतो. घरातील प्रत्येक उपकरणावर दिलेल्या वॅटेजच्या आधारे कुटुंबे सहजपणे स्वतःचे मासिक वीज वापराचे अनुमान काढू शकतात.
वीज बचतीच्या सोप्या टिप्स
1) तज्ज्ञ सांगतात की, नागरिकांना जुन्या, जास्त वीजखर्ची उपकरणांच्या ऐवजी 5-स्टार रेटिंगची साधने वापरण्याचा सल्ला देतात. जसं की आपणास माहीतच असेल की एसी आणि फ्रिजला वेगवेगळी रेटिंग दिलेली असते.
काही थ्री स्टार असतात, काही वन स्टार असतात, तर काही टू स्टार असतात. विशेष म्हणजे काही उपकरण फाईव्ह स्टार असतात. दरम्यान, जेवढे जास्त स्टार तेवढे ते उपकरण कमी वीज वापरते. यामुळे ग्राहकांना नेहमी फाईव्ह स्टार उपकरण वापरण्याचा सल्ला दिला जातो.
2) घरात वापरले जाणारे बल्ब सुद्धा कमी वीज खर्च करणारेच वापरायला हवेत. एलईडी बल्ब वापरण्याचा पण सल्ला देण्यात आला आहे. 50 किंवा 100 वॅटच्या जुन्या बल्बच्या तुलनेत एलईडी बल्ब वापरल्यास वीज ग्राहकांची 80% वीज बचत होऊ शकते.
3) वापरात नसलेली उपकरणे बंद ठेवण्यासोबतच त्यांचे प्लग सॉकेटमधून काढणेही महत्त्वाचे आहे. टीव्ही, मायक्रोवेव्ह, चार्जर्स यांसारखी उपकरणे बंद असतानाही काही प्रमाणात वीज खर्च करत राहतात. यामुळे ग्राहकांनी ही पण काळजी घ्यायला हवी.
4) एसी वापरणाऱ्यांनी तापमान 24–26°C दरम्यान ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो, कारण तापमान कमी केल्यास वीज खर्च लक्षणीय वाढतो.
5) दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा वापर करणे, खिडक्या-पडदे उघडे ठेवणे आणि अनावश्यक दिवे बंद करणे या छोट्या सवयींमुळे महिन्याचे बिल बऱ्यापैकी कमी होऊ शकते.













