Havaman Andaj : गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. धुळे जळगाव नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये बोचरी थंडीचा अनुभव येतोय.
काही ठिकाणी तर दिवसभर गार वातावरण अनुभवायला मिळतंय. अशातच आता काही हवामान तज्ञांकडून महाराष्ट्रातील हवामाना अचानक मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये ऐन हिवाळ्याच्या दिवसात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज समोर येतोय. जेष्ठ हवामान अभ्यासकं डॉक्टर मच्छिंद्र बांगर यांनी या संदर्भात सविस्तर अपडेट दिली आहे.
मध्य भारत आणि महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जोर धरत असून, सध्या तापमानात मोठी घसरण नोंदवली जात आहे. हवामान तज्ञ डॉक्टर मच्छिंद्र बांगर यांच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणारे थंड, कोरडे वारे आणि पश्चिमी झंझावातामुळे हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे.
मध्य, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत किमान तापमान १० अंश सेल्सियसपेक्षा खाली घसरले आहे. ही परिस्थिती २१ नोव्हेंबरपर्यंत कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण भारतात मात्र याच्या उलट परिस्थिती दिसून येत आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये कमी दाब क्षेत्राचा प्रभाव वाढत असून, समुद्रातून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांच्या मदतीने मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानाचा अनुभव येत आहे.
महाराष्ट्रात २२ नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागेल. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २३ नोव्हेंबरपासून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल.
२४ नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, २६ तारखेनंतर पुन्हा एकदा आकाशात उघडीप होऊन थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला आणखी एक मोठा हवामान बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात ‘सैनार’ नावाचे चक्रीवादळ तयार होऊ शकते, ज्याचा प्रभाव देशाच्या अनेक भागांवर पडेल.
१ ते ३ डिसेंबरदरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि ओरिसामध्ये गारपिटीसह पावसाचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: विदर्भ आणि मध्य भारतात हा पाऊस शेतीसाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा बांगर यांनी दिला आहे.













