Pune News : पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी शहरातील वाहनचालकांची चिंता वाढवणार आहे. खरे तर, आता पुणे शहरातील पेट्रोल पंप चालकांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय.
शहरातील पेट्रोल पंपांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने संध्याकाळी सातनंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही पण पोलिसांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण उपलब्ध करून दिले नाही आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले कमी झाले नाहीत तर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
यामुळे शहरात वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील सात दिवसांत पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांवर तीन हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत.
या सतत वाढत असलेल्या हिंसाचारामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि तातडीने सुरक्षा वाढवण्याची मागणी करण्यासाठी असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
त्यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलीस यंत्रणेला याबाबत पत्रव्यवहार करून त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी सांगितले की, “पेट्रोल पंप कर्मचारी आणि चालकांवर हल्ल्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे.
त्यामुळे आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांच्या जीविताचा धोका वाटू लागला आहे. पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यास पेट्रोल पंप संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
त्यानंतर एक थेंबही पेट्रोल उपलब्ध राहणार नाही, असे आम्ही प्रशासनाला आधीच कळवले होते.” असोसिएशनने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवलेल्या पत्रात, सुरक्षा वाढवणे, गस्त वाढवणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवा असल्याने पेट्रोल पंप पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय लागू करण्यात अडचणी असल्याचेही असोसिएशनने मान्य केले आहे. पोलिस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना आवश्यक संरक्षण मिळेल, अशी आशा डीलर्सनी व्यक्त केली आहे.
आगामी काही दिवसांत या प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. नक्कीच पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत आणि अत्यावश्यक सेवा सुविधा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन देण्याचे काम पोलिसांकडून झालेच पाहिजे.
तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर आधी हल्ले झाले आहेत त्यांना पण न्याय मिळायला हवा जेणेकरून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पण एक चांगला धक्का बसेल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.













