Maharashtra Railway : गेल्या काही वर्षांत देशात अनेक नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातही अनेक नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले आहेत. अशातच आता पुण्यातील जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून संपूर्ण जगभर ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातील नागरिकांना आता आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे.

पुणे–मिरज या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले असून रेल्वे विभागाने याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच जाहीर केली आहे. या प्रकल्पाबाबत रेल्वेने नेमकी काय माहिती दिली आहे हे आता आपण जाणून घेऊयात.
रेल्वे प्रशासनाने काय सांगितले
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पाच्या कामाला 9 वर्षांपूर्वी अर्थातच 2016 मध्ये सुरुवात झाली. हा प्रकल्प प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गाची लांबी 280 किलोमीटर इतकी असून याचा शेवटचा टप्पा कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव असा आहे.
या शेवटच्या टप्प्याचे काम गेल्या काही दिवसांपासून युद्ध पातळीवर सुरू होते आणि अखेर आता या शेवटच्या टप्प्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. म्हणजे आता संपूर्ण मार्गावर दुहेरी रुळांवर वाहतूक सुरू झाली आहे.
6 नोव्हेंबर रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वेग चाचणी घेतली. चाचणीदरम्यान गाडी ताशी 130 किलोमीटर वेगाने धावली. या यशस्वी चाचणीनंतर हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
दुहेरीकरण आणि विद्युतीकरणामुळे गाड्यांची क्षमता वाढणार असून भविष्यात गाड्यांची संख्या देखील वाढवण्याचा विचार आहे. 2016 मध्ये सुरू झालेला प्रकल्प मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.
परंतु कोरोनाकाळातील प्रतिकूल परिस्थिती, विद्युतीकरणातील तांत्रिक अडथळे आणि काही ठिकाणी झालेला भूसंपादनातील स्थानिक विरोध यामुळे कामाला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला.
तरीही आता या मार्गावर अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. सध्या पुणे–मिरज मार्गावर दररोज नऊ ते दहा गाड्या धावतात.
यामध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस आणि वंदे भारत यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. आठवड्याला एकूण 22 गाड्या या मार्गावर धावतात, त्यापैकी 11 एक्सप्रेस गाड्या साप्ताहिक आहेत.
दुहेरीकरणामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होईल, वाहतूक सुरळीत होईल आणि भविष्यात अधिक गाड्या धावू शकतील, अशी माहिती विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य चैतन्य जोशी यांनी दिली. या प्रकल्पामुळे प्रवासी तसेच रेल्वे विभाग दोघांनाही मोठा फायदा होणार आहे.













