Maharashtra Railway News : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेने नेत्र दीपक प्रगती केली आहे आणि यामुळे रेल्वे एका नव्या युगात गेलीये. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत स्लीपरच्या आगमनामुळे भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण आणखी एका नव्या उंचीवर जाणार आहे.

खरे तर वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे तर बुलेट ट्रेनला आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे एकेकाळी स्वप्न मानली जाणारी हायस्पीड रेल्वे आज वास्तवात उतरते आहे.
दरम्यान आता या दोन्ही हाय स्पीड ट्रेन कधीपर्यंत सुरू होतील या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी स्वतः माहिती दिली आहे.२०२७ आणि २०२९ ही दोन्ही वर्षे देशाच्या रेल्वे इतिहासात महत्त्वाची ठरणार आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरात बुलेट ट्रेनने जोडले जाणार
भारतीय रेल्वेचा वेग, सुविधा आणि तांत्रिक प्रगती, या सर्वांचा नवा अध्याय आता सुरू होतो आहे.
देशातील अत्याधुनिक आणि सर्वाधिक वेगवान रेल्वे प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली असून, हा संपूर्ण प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
५०८ किलोमीटरचा हा मार्ग देशाच्या रेल्वे इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल मानल जात आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा बुलेट ट्रेन चा मार्ग २०२७ मध्ये सुरू होणार आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा ऑगस्ट २०२७ मध्ये सुरु होईल.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने पूर्ण होत असून, गुजरातमधील सुरत ते वापी या १०० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावर प्रवासी सेवा ऑगस्ट २०२७ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
३२० किमी प्रतितास वेगाने धावणारी ही हायस्पीड ट्रेन मुंबई–अहमदाबाद दरम्यानचे अंतर केवळ २ तासांत पूर्ण करेल. पण सर्व १२ स्थानकांवर थांबणाऱ्या मार्गावर प्रवासाचा वेळ २ तास १७ मिनिटे असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सुरत स्टेशनला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. या भेटीबद्दल बोलताना रेल्वेमंत्री म्हणाले, “पंतप्रधान प्रकल्पाच्या गती आणि प्रगतीबद्दल समाधानी आहेत आणि हा प्रकल्प भारताच्या विकासदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.”
कधी धावणार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन?
बुलेट ट्रेनसोबतच देशातील रेल्वे क्षेत्रात आणखी एक मोठी प्रगती होत असून, वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता वंदे भारत स्लीपर सुद्धा रुळावर धावणार आहे. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या डिसेंबर २०२५ मध्ये सेवा सुरू करणार अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून समोर आली आहे.
महत्त्वाची बाब अशी की वंदे भारत स्लीपरच्या पहिल्या आवृत्तीत प्रवाशांच्या आरामावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे.
काही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, झोपेत प्रवाशांना धक्का वा अस्वस्थता जाणवू नये म्हणून स्प्रिंग्ज आणि इतर तांत्रिक घटकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सीट्स आणि स्लीपर बर्थ अधिक आरामदायी बनवण्यात आले आहेत.













