Vanshaval Marathi : शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी विविध कागदपत्रे सादर करावी लागतात.
जी मुलं मागासवर्गीय प्रवर्गात येतात अशा मुलांना जातीचा दाखला तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. दरम्यान जर तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतात आणि यामध्ये वंशावळ या कागदपत्राचा सुद्धा समावेश होतो.

वंशावळ जात पडताळणी प्रमाणपत्र समवेत वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी पडते. ‘वंशावळ’ हे दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. पण अनेकांना वंशावळ कशी काढायची हीच माहिती नसते.
यामुळे आज आपण वंशावळ काढण्याची पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वंशावळ आपल्या पूर्वजांची प्राथमिक माहिती सांगते.
जाणकार लोक सांगतात की, आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव उतरत्या क्रमाने लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हटले जाते.
यात खापर-पणजोबा, पणजोबा, आजोबा, चुलत आजोबा, त्यांची मुलं आणि पुढील पिढींची नावं क्रमवार नमूद केली जातात. इंग्रजीत याला ‘फॅमिली ट्री’ सुद्धा म्हणतात. हा दस्तऐवज जातीचा दाखला किंवा जात पडताळणीसाठी आधारभूत कागदपत्र म्हणून सादर केला जातो.
महत्त्वाची बाब म्हणजे वंशावळ काढण्यासाठी आपल्याला कुठेचं जावे लागत नाही घरबसल्या अर्जदार स्वतः वंशावळ तयार करू शकतो. सध्याच्या जन्मनोंद नोंदवहीत व्यक्तीच्या नावासमोर जात नमूद केली जात नसल्याने जुनी कागदपत्रं महत्त्वाची ठरतात.
अनेकदा आजोबा किंवा त्याआधीच्या पिढ्यांच्या शैक्षणिक नोंदी, कोतवाल बुकातील जन्म-मृत्यूची नोंद किंवा तहसील कार्यालयातील हक्क नोंदणी यामध्ये जातीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. त्यामुळे वंशावळ तयार करताना ही कागदपत्रं मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात.
तज्ज्ञांच्या मते, अर्जदाराने स्वतः वंशावळ तयार करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. वंशावळीसाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात अर्ज करण्याची गरज नसते. स्वयंघोषित स्वरूपात लिहिलेली ही माहिती अर्जदाराच्या जबाबदारीवर आधारित असल्यामुळे त्यात अचूकता ठेवणे अत्यावश्यक आहे.
चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास जात पडताळणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून जुन्या नोंदी तपासत वंशावळ व्यवस्थित तयार करावी लागते. दरम्यान काही ठिकाणी वकिल, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी नागरिकांना मार्गदर्शन करून ही प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वंशावळ काढायचे असल्यास सुरुवातीला खापर पणजोबा > पणजोबा > आजोबा + चुलत आजोबा > मग आजोबाची मुले म्हणजे तुमचे वडील + काका > मग स्वतः अर्जदार (तुम्ही) + चुलत भाऊ (काकाची मुलं) अशी पहिल्या पिढीपासून उत्तरत्या क्रमाने नाव लिहावे लागतील. वंशावळ काढण्यासाठी इंटरनेटवर अनेक नमुने सुद्धा उपलब्ध आहेत.













