Cidco New Lottery : घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सिडको ने सर्वसामान्यांना नुकतीच एक मोठी भेट दिली असून चार हजार 508 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. अगदीच निवडणुकीच्या तोंडावर सिडकोकडून ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
पण यामुळे नवी मुंबईतील घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या लॉटरीची वाट पाहिली जात होती. सिडकोच्या या लॉटरीचे अनेक दिवसांपासून चर्चा होती मात्र प्रत्यक्षात मंडळाकडून याबाबतचा निर्णय होत नव्हता.

त्यामुळे लॉटरी थेट 2026 मध्ये येणार की काय असा सवाल उपस्थित होत होता. मात्र आज अखेर सिडको कडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या भागांमधील एकूण ४५०८ घरांसाठी सिडको ने लॉटरी जाहीर केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या लॉटरीमध्ये समाविष्ट घरांसाठी अर्ज केल्यानंतर पात्र अर्जदाराला शंभर टक्के घर मिळणार आहे. ज्याचा अर्ज पहिले येईल त्याला या लॉटरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून सिडको कडून उपलब्ध करून देण्यात आलेली ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री होणार आहेत. त्यामुळे यावेळी लॉटरी किंवा सोडतीची प्रतीक्षा करण्याऐवजी अर्जदारांना थेट आपल्या आवडीनुसार घर निवडण्याची संधी उपलब्ध होणार अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे सिडकोणे हाती घेतलेली प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील ही योजना सिडकोच्या इतिहासात प्रथमच राबवली जात आहे. म्हाडाच्या विविध मंडळांनी ही योजना आधी सुद्धा राबवली आहे.
पण सिडको प्रथमच ही योजना राबवत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अनेक मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. दरम्यान या लॉटरी मध्ये समाविष्ट असणाऱ्या घरांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे.
२२ नोव्हेंबर २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि इच्छुक अर्जदाराला २१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. तसेच या कालावधीत अर्ज केलेल्या पात्र व्यक्तींना २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून त्यांच्या आवडीचे घर निवडण्याची परवानगी दिली जाईल.
रक्कम भरल्यानंतर अर्जदारांना घराचा ताबा सुद्धा तत्काळ देण्यात येणार आहे. पण, आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण केल्यानंतरच अंतिम निवड निश्चित केली जाणार आहे. ४५०८ घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १,११५ घरे तर अल्प उत्पन्न गटासाठी एकूण ३,३९३ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
म्हणजे पीएम आवास योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान सुद्धा मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या घरांवर राज्य सरकारकडून २.५ लाख रुपयांची अनुदान रक्कम देण्यात येणार आहे.
वाढत्या घरांच्या किंमतीमुळे मुंबई व उपनगरातील अनेक कुटुंबांना घरे घेणे कठीण होत असताना सिडकोची ही योजना सामान्य नागरिकांसाठी मोठा आशेचा किरण मानली जात आहे. या योजनेबाबत सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात नोंदणी करून योजना लाभदायी ठरवण्याचे आवाहन केले आहे.
सिडकोच्या अधिकृत वेबसाइट cidcofcfs.cidcoindia.com वरून ऑनलाइन नोंदणी करता येणार असून घरांचे क्षेत्रफळ, किंमत आणि इतर आवश्यक माहितीही त्याच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.













