Gold Price : मागील 30 दिवस सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अनिश्चिततेचे राहिले आहेत. भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याची बाब नोंदवण्यात आली आहे.
एका तोळे सोन्याच्या दरात तब्बल ८,००० रुपयांची घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. ऑक्टोबर महिन्यात सोन्याचा एका तोळ्याचा दर ₹१,३२,२९४ होता.

मात्र त्यानंतर सततच्या घसरणीमुळं २१ नोव्हेंबर रोजी सोने ₹८,०९९ रुपयांनी कमी होऊन ₹१,२४,१९५ रुपयांवर आले. MCX च्या आकडेवारीनुसार शुक्रवारी दरात कोणताही बदल झाला नाही आणि ते याच दरावर स्थिर राहिले.
सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीच्या मागे अनेक आर्थिक घटक कारणीभूत आहेत. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत, भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सकारात्मक वातावरण, तसेच यूएस फेडरल रिझर्व्हच्या डिसेंबरमधील संभाव्य व्याजदर कपातीच्या अंदाजामुळे गुंतवणूकदाराने सावध भूमिका घेतल्याचं तज्ञ सांगतात.
याशिवाय भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाल्याचाही सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८९.४३ या पातळीवर गेला. कमजोर रुपयामुळे आयात खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या व्यवहारांवर दिसून येतो.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या उपाध्यक्षा अक्षा कंबोज यांच्या मते देशात लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने मागणी वाढली असून किरकोळ बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर स्थिर असले तरी किरकोळ दरात किंचित सुधारणा दिसत आहे.
मागणी वाढली असली तरी जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सतर्क आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी-घसरण अशी अनिश्चितता कायम आहे. एसएस वेल्थस्ट्रीट च्या संस्थापक सुगंधा सचदेव यांनी म्हटलं की ऑक्टोबरपासून सोने ₹१,१८,००० ते ₹१,२८,००० या दरम्यान ट्रेड होत आहे.
महागाई, व्याजदर आणि जागतिक राजकीय परिस्थिती हे दरातील बदलाचे प्रमुख घटक आहेत. त्यांच्या तांत्रिक विश्लेषणानुसार सोन्याला ₹१,२१,७०० चा मजबूत सपोर्ट असून, अनुकूल परिस्थिती असल्यास ते ₹१,२८,००० पर्यंत पुन्हा वाढू शकते.
या पातळीवरून पुढे गेले तर सोने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठू शकते. दरम्यान, सोन्याच्या या सध्याच्या चढ-उताराच्या वातावरणाचा गुंतवणूकदार आणि दागिने खरेदीदार दोघेही फायदा घेत आहेत. पुढील काही आठवडे बाजाराची दिशा ठरवणारे ठरणार असल्याचं तज्ञांचे मत आहे.













