Vande Bharat Railway : वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्रातून धावणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेसला अतिरिक्त थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला हा अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मध्य रेल्वे मार्गावर सुरू असणाऱ्या मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला अतिरिक्त थांबा देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केली जात होती.

जवळपास दोन वर्षांपासून ही मागणी लावून धरण्यात आली होती. स्वतः खासदार रत्न सुप्रिया सुळे यांनी देखील मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला नवा थांबा मंजूर झाला पाहिजे अशी मागणी उपस्थित केली होती. यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेटही घेतली.
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या पाठपुराव्यानंतर आता मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते सोलापूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयाचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने अलीकडेच मुंबई–सोलापूर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड स्टेशनवर अधिकृत थांबा देण्यास मान्यता दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे याची अंमलबजावणी 24 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या नागरिकांच्या मागणीला आता यश मिळालं आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने दौंड स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस ला थांबा मंजूर केला असल्याने पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तसेच साताऱ्यातील फलटण, खटाव, तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस भागातील प्रवाशांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे.
आतापर्यंत या मार्गावरील प्रवाशांना वंदे भारतने प्रवास करण्यासाठी थेट पुणे किंवा सोलापूर गाठावे लागत होते. पण आता थेट दौंड रेल्वे स्थानकावरूनच वंदे भारत उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना मुंबई आणि सोलापूरकडील प्रवास जलद गतीने पूर्ण करता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
खरेतर, दौंड–भिगवण–फलटण हा पट्टा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत आहे. साखर उद्योग, फार्मास्युटिकल कंपन्या, तसेच विविध उत्पादन क्षेत्रातील हजारो कर्मचारी, अधिकारी आणि उद्योजकांसाठी हा जलद रेल्वेप्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
नक्कीच मुंबईला व्यवसायिक कारणांसाठी वारंवार जाणाऱ्या उद्योजकांसाठी हा थांबा वेळेची मोठी बचत करणारा राहणार आहे. दरम्यान मुंबई वरून सुटणारी वंदे भारत दौंड स्थानकावर रात्री 8:13 मिनिटांनी येणार आहे आणि सोलापूर वरून सुटणारी वंदे भारत या स्थानकावर सकाळी 8 वाजून 8 मिनिटांनी हजर होईल.













