Maharashtra New Railway Station : गेल्या काय वर्षांमध्ये महाराष्ट्रात रेल्वेचे असंख्य प्रकल्प पूर्ण झाले आहेत. राजधानी मुंबईतही रेल्वेचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाला गेले आहेत आणि काही प्रकल्पांची कामे अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहे.
दरम्यान मुंबईला पुढील वर्षी आणखी एका नव्या रेल्वे प्रकल्पाची भेट मिळणार आहे. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे. हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. पनवेल–कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडोर प्रकल्पाचे काम आत्तापर्यंत 80% पूर्ण झाले आहे.

तसेच बाकी राहिलेले काम देखील युद्ध पातळीवर पूर्ण केले जात आहे. यामुळे हा संपूर्ण प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार असा अंदाज आहे. दरम्यान हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चाचण्या, सुरक्षितता प्रमाणपत्र आणि नवीन वेळापत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरु होईल.
यानंतर मग पनवेल – कर्जत कॉरिडॉर प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. अर्थात नव्या वर्षात हा रेल्वे मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. दरम्यान आता आपण हा प्रकल्प नेमका कसा आहे, या मार्गावर किती नवीन स्थानके विकसित होतील? याची माहिती पाहणार आहोत.
कसा आहे नवा प्रकल्प ?
पनवेल ते कर्जत दरम्यानचा रेल्वे मार्ग 29.6 किमी लांबीचा आहे. यामुळे पनवेल – कर्जत लोकल प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई महानगर परिसरातील वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा राहणार आहे.
या प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तरी यासाठी 2782 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या मार्गावर पाच स्थानके उभारली जाणार आहेत. पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत ही पाच नवीन स्थानके या मार्गावर विकसित होतील आणि यामुळे या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
विशेष म्हणजे या मार्गावर उभारल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच स्थानकांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. येथे इमारत आणि मूलभूत सोयींचे काम अंतिम टप्प्यात असून इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह सिग्नल प्रणालीचे कामही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.
मार्गिकेवरील तीन बोगद्यांचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे. फ्लायओव्हरसाठी गर्डर लॉन्चिंगची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेऊन ट्रॅक बॅलास्टिंग आणि टॅपिंगचे काम नुकतेच पार पडले आहे.
त्याचबरोबर ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) प्रणाली बसवण्याचे कामही सुरु असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. दरम्यान हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पनवेल – कर्जत प्रवास 25 ते 30 मिनिटांनी लवकर होणार आहे.
नव्या कॉरिडॉरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्जतहून थेट सीएसएमटीकडे हार्बर मार्गाचा वापर करून प्रवास करता येईल. आज रोजी कल्याणमार्गे कर्जत–मुंबई प्रवास करावा लागतोय.
जो की खूपचं वेळखाऊ ठरतोय. हा मार्ग नवी मुंबई, रायगड आणि आजूबाजूच्या परिसरातील रेल्वेची कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.













