Havaman Andaj 2025 : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील थंडीचा जोर प्रचंड कमी झाला आहे आणि यामुळे थंडीच्या तीव्रतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र सध्या राज्यात सगळीकडे ढगाळ हवामान आहे आणि याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम सुद्धा होतोय.
अशातच आता राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राला लवकरच चक्रीवादळाचा तडाका बसणार असून यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात नोव्हेंबरअखेरीस वाढणाऱ्या थंडीऐवजी ढगाळ वातावरण, तापमानवाढ आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे राज्यात हवामानात मोठे चढ-उतार जाणवत आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील दोन दिवस हे बदल आणखी तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्यातील तज्ञांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मलेशिया आणि स्ट्रेट ऑफ मलक्का परिसरात विकसित झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असून, पुढील 24 तासांत अंदमान समुद्रावर नवीन कमी दाबाची रचना तयार होण्याची शक्यता आहे.
IMD च्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत या प्रणालीचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचा धोका सांगितला गेला आहे. ही प्रणाली सक्रिय झाल्यास दक्षिण भारताबरोबरच महाराष्ट्रातील हवामानावरही त्याचा परिणाम होणार आहे.
याचा परिणाम म्हणून राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी कडाक्याची थंडी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. किमान तापमान 7-8 अंशांवरून थेट 12 ते 14 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
यामुळे सकाळ-संध्याकाळची गारठा कमी झाला असून, किनारपट्टी भागात प्रचंड आर्द्रता जाणवत आहे. नव्या हवामान प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चक्रीवादळामुळे राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस हजेरी लावणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
कोमोरिन क्षेत्रावर चक्रीवादळसदृश्य स्थिती विकसित होत आहे, तर बंगालच्या उपसागरातील दक्षिण-पश्चिम भागात तसेच श्रीलंका-तमिळनाडू किनाऱ्यालगत विस्तृत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही हवामान प्रणाली एकत्रितपणे दक्षिण भारतावर तीव्र परिणाम ठरणार असून त्याचा किरकोळ परिणाम महाराष्ट्रातही उमटत आहे.
यां प्रणालीमुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस होणार आहे. याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात सुद्धा दिसेल. दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच केरळमध्ये 26 नोव्हेंबरला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
लक्षद्वीप व अंदमान-निकोबारला पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने मासेमारी करणाऱ्या लोकांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान या वातावरणामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची तीव्रता कमी राहणार आहे.
जोराची थंडी येण्यासाठी आणखी काही काळ आता वाट पहावी लागणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची परिस्थिती पुढील दोन दिवस कायम राहू शकते. दरम्यान, दक्षिण भारतातील अनेक जिल्ह्यांसाठी ही हवामान प्रणाली गंभीर ठरू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.













