Maharashtra Expressway : समृद्धी महामार्ग हा देशातील एक महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प म्हणून ओळखला जातोय. मुंबई आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला कनेक्ट करणारा हा एक महत्त्वाचा महामार्ग आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आता समृद्धी महामार्गाच्या नकाशावर येणार आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या शहराला समृद्धी महामार्ग सोबत जोडण्यासाठी एक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा आणखी एक महत्त्वाचा रस्ता निर्माण करण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पामुळे पुणे, शिरूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक क्षेत्रांना थेट समृद्धी महामार्गाची जोड मिळणार असून, औद्योगिक वाहतूक आणि प्रवास दोन्ही सुलभ होणार आहेत.
मंजूर प्रकल्पात पुणे–शिरूर महामार्गावरील 53.4 किमी अंतराचा चार व सहा पदरी उन्नत महामार्ग समाविष्ट असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन आणि बिडकीन ते ढोरेगाव या मार्गांवरील सहा पदरी रस्ता उभारणीचाही समावेश आहे.
या नव्या रस्त्यामुळे शेंद्रा–बिडकीन औद्योगिक पट्ट्यास मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पुणे ते शिरूरदरम्यान औद्योगिक वसाहती असल्याने पुढील काळात वाहनसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे ही उन्नत वाहतूक व्यवस्था तातडीने उभी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर–जालना डीएमआयसी नोड क्रमांक 1 करमाड ते बिडकीनमार्गे समृद्धी महामार्गाला नवीन सहा पदरी ग्रीनफिल्ड रस्ता जोडण्याच्या प्रस्तावाला देखील तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. रस्ते कामासोबतच भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
विशेष म्हणजे, पुणे–शिरूर मार्गातील 35 किमी उन्नत रस्त्यापैकी 7.40 किमी अंतरावर जमिनीला समांतर रस्ता, त्यावर उन्नत मार्ग आणि त्याच्याच वर मेट्रो असा त्रिस्तरीय व्हाया डक्ट उभारण्याचे काम महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ संयुक्तपणे करणार आहेत.
या संपूर्ण प्रकल्पामुळे पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर आणि समृद्धी महामार्ग यांच्यातील जोड आणखी मजबूत होणार असून, प्रदेशातील औद्योगिक वाढीस नवे बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.













