Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पुणे मेट्रो संदर्भात. पुणेकरांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. वाढती लोकसंख्या, अपुरे रस्ते आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून पुणे मेट्रोच्या टप्पा-२ ला मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खराडी-खडकवासला मार्गाची लाइन ४ आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग मार्गाची लाइन ४ए यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला.

टप्पा-२ अंतर्गत याआधी मंजूर झालेल्या लाइन २ए (वनाझ-चांदणी चौक) आणि लाइन २बी (रामवाडी-विठ्ठलवाडी) नंतर हा सर्वात मोठा विस्तार प्रकल्प मानला जात आहे. नव्या प्रकल्पामुळे पुण्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशांना अखंडित मेट्रो संपर्क मिळणार असून शहरातील प्रमुख गर्दीच्या मार्गांचा भार कमी होणार आहे.
या संपूर्ण विस्ताराची लांबी 31.63 किलोमीटर असून मार्गावर 28 उन्नत स्थानके उभारली जाणार आहेत. खराडी आयटी पार्क, हडपसरचे औद्योगिक क्षेत्र, स्वारगेट, सिंहगड रोड, कारवे रोड, वारजे परिसर तसेच खडकवसल्याचा निसर्गरम्य पट्टा या सर्व भागांना मेट्रोद्वारे जोडले जाणार आहे.
विशेषतः सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, मुंबई-बेंगळुरू महामार्ग आणि सिंहगड रोड सारख्या अत्यंत व्यग्र मार्गांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च ९,८५७.८५ कोटी रुपये असून तो भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय/बहुपक्षीय निधी संस्थांकडून उभा केला जाणार आहे.
पाच वर्षांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असून काही प्री-कॉन्स्ट्रक्शन कामे जसे की टोपोग्राफिकल सर्व्हे आणि डिझाइन संबंधी प्रक्रिया आधीपासूनच सुरू करण्यात आल्या आहेत. हडपसर रेल्वे स्थानकावर इंटरचेंज सुविधा उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे भविष्यात लोणी काळभोर आणि सासवड दिशेच्या संभाव्य मेट्रो कॉरिडॉरशीही जोडणी होऊ शकते.
यामुळे मेट्रो, रेल्वे आणि बस यांच्यातील मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. अंदाजानुसार २०२८ पर्यंत लाइन ४ आणि ४ए वर एकत्रितपणे दररोज सुमारे ४.०९ लाख प्रवासी प्रवास करतील.
हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत राबवला जाणार आहे. नव्या मंजुरीमुळे पुणे मेट्रोचे जाळे आता १०० किलोमीटरचा टप्पा गाठणार असून शहराच्या शाश्वत आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेकडे एक मोठे पाऊल टाकले गेले आहे.













