Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी संबंधित आहे. ही बातमी श्रीक्षेत्र आळंदी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी अधिक खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री क्षेत्र आळंदी येथे नजीकच्या काळात पीएमपीएल चे नवीन आगार तयार करण्यात येणार आहे.
अजून आळंदी येथे पीएमपीएलचे आगार नाहीये. पण लवकरच येथे आगार तयार होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जागा पीएमपीएल प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एमएसआरटीसीची आळंदी येथील आठ एकर जागेपैकी सुमारे 4 एकर जागा पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे आळंदी परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून एसटी व पीएमपीच्या सुविधा एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. एसटी महामंडळाकडून या जागेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे.
या डीपीआरमध्ये पीएमपी स्थानकाचा समावेश करण्यात येणार असून लवकरच दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या ऑगस्ट महिन्यातील बैठकीत एसटीच्या मोकळ्या भूखंडांच्या भाडेतत्वाची मुदत ६० वर्षांवरून ९८ वर्षांपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली होती.
त्यानुसार राज्यभरातील अशा भूखंडांचा सार्वजनिक, खासगी व पीपीपी पद्धतीने विकास सुरू आहे. आळंदीत नवीन एसटी आगार उभारण्याची तयारीही सुरू असून या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने त्यांच्या बसस्थानकासाठी जागेचा समावेश करण्याची मागणी केली होती.
आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजुरीनंतर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र दिल्याने जागा हस्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. “स्थानिक व्यवहार्यता तपासून पीएमपीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
दोन्ही संस्था एमओयू करून पुढील नियोजन करतील,” असे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा भाविकांना होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळामुळे आळंदी येथे कार्तिकी आणि आषाढी एकादशी, जयंती तसेच गुरुवार आणि विशेष सणांच्या दिवशी लाखो भाविक येतात.
राज्याच्या विविध भागांतून थेट आळंदी येथे एसटी बस उपलब्ध असतात, मात्र पुढील शहरांत किंवा परिसरात जाण्यासाठी स्वतंत्र वाहतुकीची गरज भासत असे.
येथील नव्या संयुक्त स्थानकामुळे एसटी आणि पीएमपी दोन्ही सेवा एकाच ठिकाणावरून उपलब्ध होतील, ज्यामुळे वारकऱ्यांना मोठी सोय होणार आहे. या निर्णयामुळे आळंदी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत आधुनिक नियोजनास चालना मिळून तीर्थक्षेत्र विकासालाही वेग येणार आहे.













