Aadhar Card News : आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहेत. आधार कार्ड हे देशातील नागरिकांचे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. या कागदपत्राविना देशात कोणतेच काम होत नाही. देशात साध सिम कार्ड जरी काढायच असेल तरी सुद्धा आधार कार्ड द्यावे लागते.
खरेतर, देशात आधार प्रणाली सुरू झाल्यापासून आजवर करोडो लोकांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे नवीन जन्मलेल्या बालकांना देखील आधार देण्यात येत आहे. परिणामी देशातील आधार कार्ड धारकांची संख्या वाढणार आहे.

यामुळे UIDAI च्या डेटाबेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, आतापर्यंत आधार कार्ड एकदा निघाले की ते निष्क्रिय करण्याची सोय नाही. म्हणजे आधार कार्ड रद्द करता येऊ शकत नव्हते.
पण, याचा परिणाम म्हणून अनेकजणांच्या मृत्यूची माहिती वेळेवर UIDAI कडे पोहोचत नाही आणि त्या मृत व्यक्तींचे आधार क्रमांक सक्रिय राहतात आणि याचाच गैरवापर करून देशभरात विविध प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत.
आता याचं गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी UIDAI ने एक देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत आतापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रीय करण्यात आले आहेत. वास्तविक, गेल्या 15 वर्षांत करोडो आधारधारकांपैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे.
पण तरीही त्याची अधिकृत नोंद UIDAI पर्यंत न पोहोचल्याने अनेकांचे आधार क्रमांक वापरात राहिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या सक्रिय क्रमांकांचा वापर करून काही ठिकाणी बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे तसेच विविध आर्थिक फसवणुकी करण्याचे प्रकार वाढत होते.
मृत व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित
UIDAI आता मृत व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी विविध संस्थांकडून डेटा गोळा करत आहे. यामध्ये, भारताचे रजिस्ट्रार जनरल, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या नागरी नोंदणी प्रणाली, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) यांचा समावेश आहे.
या संस्थांकडील नोंदींच्या पडताळणीवर आधारित माहिती UIDAI स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून तपासून मगच आधार क्रमांक रद्द करत आहे. त्यामुळे जिवंत व्यक्तीचा आधार क्रमांक चुकीने बंद होण्याची शक्यता नाहीशी होते.
पुढील टप्प्यात बँका आणि इतर महत्त्वाच्या संस्थांची मदतही घेतली जाणार आहे. यासाठी UIDAI पोर्टलवर नवीन सुविधा सुरु झाली आहे. या पोर्टलवर आता ‘मृत्यू नोंदणी’ ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्यास त्याची नोंद UIDAI पर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी करण्यात आली आहे. आधारच्या अधिकृत पोर्टलवर ‘कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंदणी’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचा आधार क्रमांक, मृत्यू नोंदणी क्रमांक आणि मृत्यू प्रमाणपत्रातील माहिती यात भरता येते. हे तपशील कुटुंबीय स्वतः पोर्टलवर सबमिट करू शकतात.
UIDAI ने आवाहन केले आहे की अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र मिळताच ही नोंदणी करावी, जेणेकरून संबंधित आधार क्रमांक तातडीने निष्क्रीय करून त्याचा गैरवापर थांबवता येईल. तसेच निष्क्रीय आधार क्रमांक पुन्हा कोणालाही दिला जाणार नाही.
UIDAIने स्पष्ट केले आहे की मृत्यूनंतर निष्क्रिय झालेला आधार क्रमांक पूर्णपणे गोठविला जातो. तो क्रमांक भविष्यात कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येणार नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या माहितीचा भविष्यात गैरवापर होण्याची शक्यता पूर्णपणे टळेल.













