नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबणार….; पुण्यातील ‘या’ भागात विकसित होणार नवीन रस्ता !

Published on -

Pune News : पुण्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नवले पुलावर सतत होणारे अपघात रोखण्यासाठी आणि जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या रिंगरोड प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. त्यात ‘पीएमआरडीए’चा रिंगरोड अधिक व्यवहार्य ठरला असून, याच पर्यायाला प्रशासनाने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

जांभूळवाडी येथून थेट पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे स्टेडियमपर्यंत रिंगरोडचा जोडमार्ग तयार झाल्यास नवले पुलाला प्रभावी पर्याय निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाच्या पाहणीतून समोर आला.

याबाबत पुढील दोन दिवसांत महत्त्वाची बैठक घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

नवले पुलाजवळ दहा दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सरकार आणि विविध विभागांनी तातडीने पावले उचलली असून, नवले पुलावरील वाहतूकभार कमी करण्यासाठी रिंगरोड हा सर्वात प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे प्रशासनाचे मत आहे.

पुणे जिल्ह्यात इनर रिंगरोडचे काम पीएमआरडीएकडे, तर आउटर रिंगरोडचे काम एमएसआरडीसीकडे आहे. नवले पुलाच्या परिसरातून एमएसआरडीसीचा रिंगरोड जात असला, तरी तो भूमिगत असल्याने त्याच्या कामाला मोठा कालावधी लागू शकतो.

याउलट पीएमआरडीएचा सुमारे ४० किलोमीटर लांबीचा रिंगरोड जांभूळवाडीमार्गे गहुंजे स्टेडियमपर्यंत वेगाने पूर्ण करता येऊ शकतो.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, “पीएमआरडीए रिंगरोड ज्या गावांतून जाणार आहे, त्या सर्व गावांतील जमिनींची मोजणी पूर्ण झाली आहे. तीन गावांच्या भूसंपादनाच्या दरांची निश्चितीही झाली आहे.

उर्वरित गावांसाठी दर एक महिन्यात ठरवले जातील. यासाठी या आठवड्यात बैठक घेतली जाईल. त्यामुळे रिंगरोडचे काम गतीने पुढे नेता येईल.”

नवले पुलावरील अपघाताचा धोका कमी करणे आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्‍यासाठी हा रिंगरोड निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe