Pune Metro News : पुण्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्याला लवकरच आणखी एका मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. आता पुण्यातील एक महत्त्वाचा भाग मेट्रोच्या नकाशावर येणार असून यामुळे सर्वसामान्य जनतेचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता खराडी ते पुणे एअरपोर्ट असा नवा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार असून याच संदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे. खरे तर, सद्यस्थितीला पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे दोन मेट्रो मार्ग सध्या कार्यान्वित आहेत आणि या मेट्रो मार्गांच्या विस्तारीकरणाचे काम देखील युद्धपातळीवर केले जात आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हिंजवडी ते शिवाजीनगर असा तिसरा मेट्रो मार्ग विकसित केला जातोय. तसेच खराडी ते खडकवासला असाही नवीन मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.
दरम्यान आता खराडी ते पुणे एअरपोर्ट असा नवा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. मेट्रोने थेट विमानतळ गाठता यावे या अनुषंगाने हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुरली अण्णा यांनी सांगितल्याप्रमाणे खराडी ते पुणे एअरपोर्ट असा मेट्रो मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मेट्रो मार्गाचा डीपी आर तयार करण्यासाठी संबंधितांना सुचित करण्यात आले आहे.
याच्या डीपीआर साठी महा मेट्रो आणि पुणे महापालिका सामूहिकरीत्या काम करत आहे. विशेष बाब म्हणजे सरकारने अलीकडे दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिलेली आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 – खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप-वारजे – माणिकबाग या दोन मार्गिकांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन नवीन 31.6 किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या दोन्ही उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिकांची एकत्रित लांबी 31.60 किलोमीटर असून, त्यावर एकूण 28 स्थानके विकसित केली जाणार आहेत. याच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर यासाठी 9857 कोटी 85 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच हे काम पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.













