Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणार आहे एक नवा रेल्वे मार्ग प्रशासनाच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा डी पी आर सुद्धा रेडी झाला आहे आणि हा डीपीआर मंजुरीसाठी वर पाठवण्यात आला आहे.
पण दिल्ली दरबारी वर्ग झालेल्या या प्रस्तावाकडे अजून सरकारचे लक्ष गेलेले नाही आणि अजूनही या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळालेला नाही. यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये शासनाविरोधात नाराजी पाहायला मिळत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वे मंत्रालयाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर ते पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. हा रेल्वे मार्ग 85 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
हा रेल्वेमार्ग संबंधित दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पण, रेल्वेमार्गाच्या उभारणीला अद्यापही केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली नाही आणि यामुळे संभाजीनगर ते अहिल्यानगर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.
वास्तविक, सहा महिन्यांपूर्वी या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच ‘डीपीआर’ केंद्राकडे पाठविण्यात आला होता. मात्र मंजुरीप्रक्रिया विलंबत असून, त्यामुळे हा प्रकल्प कागदावरच अडकून पडल्याची चर्चा प्रवासी व नागरिकांमध्ये सुरू आहे.
या प्रस्तावित रेल्वेमार्गामध्ये ‘सिंगल’ नव्हे, तर ‘डबल लाइन’ तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्युतीकरणासह या प्रकल्पाचा एकूण खर्च 2 हजार 235 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी तसेच वाढत्या औद्योगिक वाहतुकीला चालना देण्यासाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरेल, असे रेल्वे खात्याचे मत आहे.
किती स्थानके विकसित केली जाणार
रेल्वेने तयार केलेल्या प्रारूपानुसार या मार्गात देवगिरी कॅन्ट, रांजणगाव, येसगाव, गंगापूर, देवगड, नेवासा, उस्थाळ दुमाला, शनिशिंगणापूर, ब्राह्मणी आणि वांभोरी अशी दहा प्रमुख स्टेशन समाविष्ट करण्यात आली आहेत.
या मार्गामुळे दोन्ही शहरांदरम्यानच्या प्रवासाला वेग आणि सोयी मिळणार असून, ग्रामीण भागासाठीही नवीन विकाससंधी निर्माण होतील. या मार्गाचा सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे तो पुणे महामार्गालगत होणार की नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात हा मार्ग महामार्गालगतच तयार केला जाईल, असे संकेत दिले होते. यामुळे पुढे हा मार्ग छत्रपती संभाजीनगर–पुणे रेल्वे मार्गाच्या भविष्यातील विस्तारीकरणाला जोडला जाईल का, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
औद्योगिक गुंतवणुकीमुळे प्रकल्पाला महत्त्व
छत्रपती संभाजीनगरमध्ये अलीकडेच झालेल्या 90 हजार कोटी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीमुळे या रेल्वेमार्गाचे महत्त्व वाढले आहे.
मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मालवाहतूकीसाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरेल, असे रेल्वे अभ्यासक स्वानंद सोळंके यांनी मत व्यक्त केले. त्यांनी आगामी केंद्र अर्थसंकल्पात या मार्गाला मंजुरी व निधीची तरतूद व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
लवकरच मंजुरी मिळणार
दरम्यान, केंद्रीय मंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी या प्रकल्पाचा डीपीआर अंतिम करण्यात आल्याची पुष्टी दिली असून, रेल्वे बोर्डाकडून लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मंजुरी मिळाल्यास मराठवाड्यासाठी हा एक महत्त्वाचा विकासमार्ग ठरणार आहे.













