Shirdi News : अहिल्यानगर ते शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता नगरहुन साईबाबांच्या नगरीत पोहचणे आणखी सोयीचे होणार आहे. कारण की, गेल्या तीन दशकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या शिर्डी–अहिल्यानगर महामार्गाची दुरवस्था आता दूर होत आहे. 30 वर्ष जो मार्ग त्रासदायक ठरत होता आता त्याचे रुपड बदलणार आहे. सध्या या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे.
खरेतर हा रस्ता म्हणजे खड्ड्यांनी भरलेला, अपघातांना कारणीभूत ठरलेला आणि जनतेच्या रोषाचा विषय. पण आता याची व्याख्या बदलणार आहे, हा मार्ग आता खऱ्या अर्थाने कात टाकणार आहे. हा रस्ता एकदम गुळगुळीत बनवला जातोय अन काही भागात तो चांगला गुळगुळीत झाला आहे. यामुळे ही सरत्या वर्षातील सर्वात मोठी दिलासादायक बातमी ठरत आहे. दरम्यान पुढील काही महिन्यांत हा संपूर्ण रस्ता पूर्णतः तयार होणार आहे. या रस्त्याचा सावळीविहीर ते अहिल्यानगरदरम्यानचा 75 किलोमीटरच्या महत्वाच्या टप्प्याचे काम सध्या जलदगतीने केले जात आहे. या पट्ट्यात 101 ठिकाणी असलेल्या नाले आणि ओढ्यांवर आधुनिक कल्वर्ट म्हणजे मोऱ्या टाकण्याचे काम जोरात सुरू आहे.

रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने या रस्त्याचे वारंवार नुकसान होत आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी प्राधान्याने मोऱ्या बांधण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे गरजेनुसार दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी गटारींचीही उभारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात रोडवर अन रस्त्याच्या बाजूला पाणी साचण्याचा प्रश्न सुटणार आहे. रस्त्याची उंची जमीन सपाटीपासून सुमारे चार फूट वाढवली जात आहे. मुरूम–खडीची भर टाकून रोलिंगची प्रक्रिया पूर्ण होताच डांबरीकरणाचा पहिला थर टाकण्यास सुरुवात झाली आहे.
जिथे हे काम झाले आहे, तेथील रस्त्याचे बदललेले रूपकळे जनतेच्या उत्सुकतेत भर घालत आहे. कामाचा वेग वाढवण्यासाठी दोन स्वतंत्र टीम्स यंत्रसामग्रीसह कार्यरत आहेत. शिंगणापूर–बाभळेश्वर आणि अहिल्यानगर बाह्यवळण रस्ता–शिंगणापूर या दोन विभागांत एकाच वेळी रस्त्याची कामे सुरु आहेत. कोल्हार येथील दररोजची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील पूल बांधणीचे कामही अंतिम टप्प्यात असून पुढील चार–पाच महिन्यांत हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
प्रकल्प संचालक धानेश स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलपर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी त्यापूर्वीच तीन महिने म्हणजे पुढील डिसेंबरपर्यंतच मोठा टप्पा पूर्ण होईल. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर देहरे आणि पिंपरी निर्मळ येथे टोलनाके सुरू करण्यात येणार आहेत. अनेक अडथळे आणि प्रशासकीय समस्यांवर मात करत महामार्गाच्या कामाला मिळालेला वेग ग्रामीण भागासाठी दिलासादायक ठरत आहे. पूर्ण झालेले रस्ते नेटवर्क परिसरातील वाहतूक, व्यापार आणि दळणवळणाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा आहे.













