Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वसामान्य बँक ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून आरबीआय लवकरच कर्ज स्वस्त करणार असे या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता या चर्चा सत्यात उतरल्या आहेत आणि कर्जाचे व्याजदर आता कमी होणार आहे. चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) तीन दिवसीय बैठकीनंतर RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25% कपात केल्याची घोषणा केली.
या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून स्थिर असलेला रेपो दर कमी होऊन आता 5.25% वर आला आहे. RBI च्या या घोषणेचा थेट फायदा देशातील सर्वसामान्य कर्जदारांना मिळणार आहे. रेपो रेट कमी झाल्याने बँकांकडून दिल्या जाणाऱ्या विविध कर्जांच्या व्याजदरांमध्ये घट अपेक्षित असून होम लोन, कार लोन तसेच वैयक्तिक कर्जांचे EMI पूर्वीपेक्षा कमी होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मासिक खर्चावरचा ताण कमी होईल आणि त्यांच्या खिशात अधिक वापरण्यायोग्य रक्कम उरेल.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, EMI मध्ये अपेक्षित घट झाल्याने बाजारात खरेदीची क्षमता वाढेल. ग्राहकांच्या क्रयशक्तीत होणारी वाढ अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यास मदत करेल. घर, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स तसेच इतर उपभोग्य वस्तूंच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, या निर्णयाचा एक दुय्यम परिणामही दिसून येऊ शकतो. रेपो रेट कमी झाल्यानंतर बँका कर्जावरील व्याजदर तर कमी करतीलच, पण त्याचबरोबर फिक्स्ड डिपॉझिट (FD) धारकांना मिळणाऱ्या व्याजदरांमध्येही घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक FD मध्ये केली आहे, त्यांना कमी परतावा मिळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
RBI चा हा निर्णय महागाईदरातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 0.25% पर्यंत खाली आला होता, जो गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी पातळी होती. तसेच घाऊक किंमत निर्देशांकातही 1.21% घट नोंदवली गेली. महागाई आटोक्यात येत असल्यानेच RBI ने फेब्रुवारीपासून आजपर्यंत तीन टप्प्यांमध्ये मिळून एकूण 1% रेपो रेटमध्ये कपात केली आहे. नवीन रेपो दरामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल, गुंतवणूक वाढेल आणि बाजारातील उत्साह आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. RBI च्या या निर्णयाने कर्जदारांना दिलासा मिळणार असतानाच आर्थिक क्षेत्रासाठीही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.












