Maharashtra News : महाराष्ट्रातील एका बड्या महानगरपालिकेने आपल्या हद्दीत फ्री वायफाय देण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर सध्या संपूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन डिसेंबर रोजी राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आता दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान महानगरपालिकाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच राज्यातील एका महत्त्वाच्या महानगरपालिकेने नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहराला मोफत वायफाय उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे शहराला डिजिटल बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत झालेल्या आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या ऐतिहासिक निर्णयानंतर शहरातील नागरिकांमुळे उत्साहाचे वातावरण असून महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. सदर बैठकीत प्रताप सरनाईक म्हणाले की, मीरा भाईंदर हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे.
केवळ गेल्या तीन वर्षांत शहरात तब्बल 1,800 कोटी रुपयांचे विकास काम पूर्ण झाले असून, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास वेगवान झाला आहे.
या सर्व विकासकामांना डिजिटल सुविधांचा मजबूत आधार मिळावा, यासाठी मोफत वाय-फाय हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उदयोन्मुख शहरांमध्ये मोफत वाय-फाय उपलब्ध करून देण्याची मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून सुरू झाल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले.
ज्ञान, माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाची मोफत उपलब्धता देणारी ही तंत्रज्ञानसुविधा “प्रगतीची एक नवीन लाट” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल सेवांकडे वाढणारा कल, शासकीय कामकाजाचे ऑनलाईन स्वरूप, तसेच नागरीकांच्या दैनंदिन जीवनातील डिजिटल प्लॅटफॉर्मचा वाढता वापर लक्षात घेता मोफत वाय-फाय सुविधा हा मोठा दिलासा ठरणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकार आणि स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स यांच्यात नुकताच झालेला महत्त्वाचा सामंजस्य करार हा राज्याच्या डिजिटल विकासातील आणखी एक निर्णायक टप्पा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानुसार, राज्यातील दुर्गम भागांमध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सुविधा सुरू करण्यात येणार आहे. स्टारलिंकशी भागीदारी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, या माध्यमातून अगदी शेवटच्या टोकाच्या गावांपर्यंतही उच्च-गती इंटरनेट पोहोचणार आहे.
मोफत वाय-फाय शहर प्रकल्पामुळे मीरा-भाईंदरला स्मार्ट सिटीच्या दिशेने मोठी गती मिळणार असून, शिक्षण, व्यवसाय, प्रशासन आणि नागरिकसेवा या सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल परिवर्तनाचा नवा टप्पा गाठला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













