Mumbai – Nagpur Bus : मुंबई – नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आज एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरेतर, नागपूरहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या दोन्ही महानगरादरम्यान प्रवास करणारे प्रवासी रेल्वे तसेच बसेसमधून प्रवास करतात.
दरम्यान नागपूर मुंबई दरम्यान बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आता खासगी बस प्रवासात आराम, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा नवा मानदंड उभा करत नागपूर–मुंबई दरम्यान धावणाऱ्या एका ट्रॅव्हल कंपनीने वॉशरूमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

आस्था ट्रॅव्हल्सने प्रवाशांसाठी ऑन-बोर्ड वॉशरूमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारतीय रेल्वेसारखा सोयीस्कर आणि सुलभ प्रवास खासगी बस सेवेने देण्याचा हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.
विशेषत: वृद्ध, महिला, रुग्ण आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मागील काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवेतील गोंधळामुळे देशातील अनेक विमानसेवा विस्कळीत झाल्या आहेत.
त्याचा थेट परिणाम नागपूर–मुंबई आणि नागपूर–पुणे मार्गावरील प्रवाशांवर झाला असून, अनेकांनी पर्याय म्हणून खासगी ट्रॅव्हल्सकडे वळण्यास सुरुवात केली आहे. लांब प्रवासादरम्यान टॉयलेट सुविधेची मोठी गरज जाणवत असल्याने आस्था ट्रॅव्हल्सची ही नवीन व्यवस्था प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत आहे.
३४-सीटर स्लीपर कोच असलेल्या या बसमध्ये फक्त मूत्रविसर्जनासाठी स्वतंत्र वॉशरूम देण्यात आले आहे. हा वॉशरूम तयार करण्यासाठी ट्रॅव्हल्सने दोन स्लीपर सीट्स कमी केल्या असून महसुलात काहीसा तोटा पत्करूनही प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चव्हाण यांनी सांगितले.
बसमधील सर्व स्लीपर बर्थ मऊ, स्वच्छ आणि आरामदायी असून, वापरली जाणारी ब्लँकेट्स व बेडशीट्स दररोज स्वच्छ धुऊनच प्रवाशांना दिली जातात. स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर नागपूर–मुंबई प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या महामार्गावर सुरक्षित, आधुनिक आणि आरामदायी बससेवेची कमतरता जाणवत होती. याची दखल घेऊन अनेक मोठ्या ट्रॅव्हल्सकंपन्यांनी या मार्गावर नवीन बसेस सुरू केल्या असून, आस्था ट्रॅव्हल्सचे हे मॉडेल प्रवाशांसाठी अधिक आकर्षक ठरत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये अग्निशामक यंत्रे, इमर्जन्सी एक्झिट, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा अलार्म सिस्टम बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या प्रवासासाठी प्रशिक्षित चालक व सहायक कर्मचारी नियुक्त केले जातात.
तसेच बसचा वेग, मार्गावरील परिस्थिती आणि सुरक्षितता यावर सतत प्रशासनाच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाते. मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक एसी नियंत्रण, ब्राइट–डिम लाइटिंग यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे ही बस सेवा रेल्वेच्या आरामदायी प्रवासाला तगडे पर्याय ठरत आहे.













