रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ रेशनकार्ड धारकांना साखरेचा लाभ मिळणार, वाचा सविस्तर

Published on -

Ration Card News : राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून रेशन कार्ड धारकांची साखर बंद करण्यात आली आहे मात्र आता त्यांना धान्यासोबतच साखर पण दिली जाणार आहे.

दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी साखर वाटपाचा एक अगदीच महत्त्वाचा आणि दिलासादायक बातमी आली आहे. तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेला रेशन दुकानांतील साखरेचा पुरवठा पुन्हा सुरू होणार अशी माहिती पुरवठा विभागाकडून समोर आली आहे.

प्रत्येक अंत्योदय कार्डला प्रतिमहा एक किलो साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ तसेच जानेवारी २०२६ या तीन महिन्यांसाठी साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे.

टेंडर प्रक्रियेत अडचणी आल्याने गेल्या दीड वर्षांपासून रेशन दुकानांतून साखर वितरण पूर्णपणे बंद होते. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे ८७ हजार ०६४ अंत्योदय कार्डधारक कुटुंबांना बसला होता.

सामान्यतः सर्वसामान्य कुटुंबांमध्ये सण-उत्सवांच्या काळातच गोड पदार्थ तयार केले जातात. मात्र साखर उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांना बाजारातून जास्त दराने साखर खरेदी करावी लागत होती.

सध्या बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ४४ ते ४६ रुपयांच्या आसपास आहे. मात्र रेशन दुकानातून ही साखर अवघ्या २० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार असल्याने गरीब व गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

लाभार्थ्यांना कमी दरात साखर मिळाल्याने सणासुदीच्या काळात गोड पदार्थ बनवणे शक्य होणार आहे. लाभार्थ्यांना पुन्हा साखर मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत नियतनाची मागणी केली होती.

त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या कालावधीसाठी सुमारे पाच हजार क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. ही साखर आता जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात दाखल झाली असून, वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

सध्या एक महिन्याचे नियतन प्राप्त झाले असून काही ठिकाणी वाटप सुरू झाले आहे. आगामी काही दिवसांत सर्व रेशन दुकानांतून साखरेचे वितरण पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. दीड वर्षानंतर मिळणाऱ्या या साखरेमुळे अंत्योदय कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला असून, नववर्षापूर्वीच त्यांच्या घरी गोडवा परतणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe