दुष्काळात तेरावा महिना ! आता ‘या’ कारणामुळे सोयाबीनचे दर गडगडण्याची भीती

Published on -

Soybean Rate : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाच पीक. सोयाबीन ची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठया प्रमाणात केली जाते. मध्य महाराष्ट्रात सुद्धा याची बऱ्यापैकी लागवड होते.

राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. आकडेवारीवर नजर टाकायची झाल्यास राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40% उत्पादन घेतले जाते आणि आपले राज्य उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या नंबर वर आहे.

दरम्यान राज्यातील तसेच देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. चिंता वाढवणारी बातमी अशी की दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयातीचा सौदा पूर्ण झाला आहे.

यामुळे आता देशातील सोयाबीन उपलब्धता वाढणार आहे आणि साहजिकच याचा परिणाम म्हणून देशातील स्थानिक बाजारात दर घसरण्याची शक्यता बळावत चालली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना हमीभाव आणि दरवाढीची आश्वासने देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात आयात वाढल्यामुळे त्या आश्वासनांवर पाणी फिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतून तब्बल एक लाख टन सोयाबीन आयात करण्याचा मोठा सौदा निश्चित करण्यात आला आहे. हा माल लवकरच मुंबई बंदरात दाखल होणार असून त्याचा थेट परिणाम मराठवाड्यातील बाजारभावांवर होणार आहे.

आयात सोयाबीनचा अंदाजे खर्च 4,870 रुपये प्रति क्विंटल पडत असल्याने सरकारने जाहीर केलेला 5,328 रुपये हमीभाव मिळणे कठीण होईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली.

स्थानिक उत्पादन कमी असल्याने प्रक्रिया उद्योगांना कच्च्या मालाची कमतरता भासू नये म्हणून आयातीचा मार्ग अवलंबण्यात आला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लातूर बाजारपेठेत पहिला मोठा आयात सौदा पूर्ण झाल्यानंतर इतर व्यापारीही आयातीला प्राधान्य देताना दिसत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर ₹4,650 प्रति टन आहे, तर बंदरावर उतरवताना प्रतिटन सुमारे ₹220 अतिरिक्त साठवणूक खर्च येतो. तरीही हा माल स्थानिक बाजारातील दरांच्या तुलनेत स्वस्त ठरत असल्याने उद्योगांना आयात फायद्याची ठरत आहे.

मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, जालना आदी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर सोयाबीन प्रक्रिया उद्योग चालतात. स्थानिक उत्पादन कमी असल्याने या उद्योगांना आयात सोयीस्कर ठरत असले तरी त्याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

निवडणुकीत दरवाढीची आश्वासने देऊन आता आयात वाढवून पिकांचे दर पाडले जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. आता येत्या काही आठवड्यांत आयात माल बाजारात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने स्थानिक सोयाबीनचे दर आणखी घसरतात का, की स्थिरावतात, याकडे शेतकरी, व्यापारी आणि उद्योग यांचे लक्ष लागले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe