New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये देशात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्णत्वाला गेली आहेत तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहेत. तर काही प्रकल्प प्रस्तावित आहेत मात्र त्यांना अजून मंजुरी मिळालेली नाही.
तसेच काही प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे. हा मुंबई – दिल्ली एक्सप्रेस वे नंतर सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.

देशातील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला सुरत–चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे देशातील दुसरा सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार असून याचे काम वेगाने पुढे सरकत आहे.
दरम्यान या 1271 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नाशिक–चेन्नई दृतगती मार्ग. या मार्गामुळे नाशिकला उत्तर भारत, दक्षिण भारत आणि दोन महत्त्वाच्या सागरी बंदरांशी थेट, वेगवान जोडणी मिळणार आहे.
या दृतगती मार्गाचा एक प्रमुख फायदा म्हणजे वाढवण बंदर (पालघर) आणि चेन्नई बंदर यांना प्रथमच थेट जोडणी मिळणे. नाशिकमधून सुरू होणारा हा मार्ग पुढे वाढवण बंदराशी जोडला जात असल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.
बंदरांपर्यंतची सुलभ पोहोच निर्यात–आयात वाढवण्यास मदत करणार आहे. प्रकल्पाचे दोन टप्पे या एक्सप्रेसवेचे काम दोन मुख्य टप्प्यांत विभागले गेले असून, पहिल्या टप्प्यात नाशिक ते अक्कलकोट या 374 किमी अंतराचा सहा पदरी दृतगती मार्ग उभारला जात आहे.
सध्या नाशिक–अक्कलकोट दरम्यानचे 524 किमी अंतर पार करण्यासाठी सुमारे 9 तास लागतात. मात्र नव्या दृतगती मार्गामुळे हे अंतर तब्बल 150 किमीने कमी होणार असून प्रवासाचा वेळही निम्म्यावर येत फक्त 4 तासांवर येणार आहे.
संपूर्ण प्रकल्प BOT मॉडेल अंतर्गत विकसित केला जात आहे. सहा राज्यांना थेट जोडणी हा एक्सप्रेसवे भारतातील सहा राज्यांना एकाच मार्गाने जोडणार आहे — गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. दिल्ली–मुंबई दृतगती मार्गानंतर देशातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब एक्सप्रेसवे ठरणार आहे.
नाशिक–चेन्नई प्रवास जो पूर्वी 22–23 तासांचा होता, तो नव्या मार्गामुळे फक्त 12 तासांत पूर्ण होईल. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या जोडण्या नाशिकमध्ये हा मार्ग आडगाव ट्रक टर्मिनलमधून मुंबई–आग्रा महामार्गाला जोडला जाईल.
गोंदे-दुमाला येथे तवा नाशिक एक्सप्रेसवेशी जोडणी होणार असून, याच मार्गाने वाढवण बंदरापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. सिन्नर तालुक्यातील वावी येथून हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे.
सहा तालुके व सुमारे 70 गावांमधून जाणाऱ्या या मार्गासाठी सुमारे 195 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अक्कलकोट, कलबुर्गी, कर्नूल, कडप्पा, तिरुपती आणि चेन्नई ही प्रमुख शहरे या मार्गामुळे थेट जोडली जाणार आहेत.
हा दृतगती मार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिकचे व्यापार, उद्योग, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्र नक्कीच नव्या उंचीवर पोहोचणार आहे. यामुळे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.













