Railway News : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे देशातील रेल्वे नेटवर्क सातत्याने विस्तारत आहे.
महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचे अनेक नवीन मार्ग विकसित झाले आहेत. तसेच काही रेल्वे मार्गांची कामे प्रस्तावित आहेत. असाच एक प्रस्तावित रेल्वे मार्ग म्हणजे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग.

या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे आणि अखेर हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून या प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे आदेश काय
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी मुख्यमंत्री महोदयांनी भूसंपादन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. खरे तर हा रेल्वे मार्ग पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन्ही विभागांसाठी फारच महत्त्वाचा आहे.
या प्रकल्पामुळे कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. कोल्हापुरातून थेट वैभववाडीला रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने या भागातील एकात्मिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.
खरे तर हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून केला जात असून या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासन खर्च करणार आहे. या मार्गासाठी राज्य सरकारच्या हिश्श्याची तरतूद करा, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
या निर्णयामुळे जवळपास एका दशकापासून मंजूर झालेल्या या मार्गाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे. फडणवीसांच्या या आदेशामुळे आता लवकरच या प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होणार आहे.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग प्रकल्पाला फेब्रुवारी 2016 मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यावेळी या मार्गासाठी 3244 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. महत्त्वाची बाब म्हणजे 2016 मध्ये केंद्रातील सरकारने आपल्या हिश्याच्या पैशांची तरतूद केली होती.
मात्र आता या प्रकल्पासाठी जवळपास 5000 कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर जवळपास 108 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग तयार होणार आहे.
यासाठी जवळपास 639 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाईल. या रेल्वे मार्गात 28 किलोमीटर लांबीचे एकूण 27 बोगदे तयार केले जाणार आहेत. तसेच या मार्गावर एकूण दहा नवीन रेल्वे स्टेशन विकसित होणार आहेत.













