Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास ठरणार आहे. तुम्ही सुद्धा यावर्षी दहावी किंवा बारावीला ऍडमिशन घेतलेले असेल तर नक्कीच ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.
खरे तर दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच समोर आले आहे आणि याच बोर्ड परीक्षा संदर्भात आता बोर्डाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये दहावी आणि बारावीच्या फायनल बोर्ड एक्झाम घेतल्या जाणार आहेत.

यावर्षी वेळे आधीच बोर्ड एक्झाम होणार आहेत आणि वेळेच्या आधीच निकाल सुद्धा जाहीर होणार आहेत. दरम्यान या परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता बोर्डाकडून एक नवा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या निर्णयानुसार दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी बोर्ड परीक्षा देतील त्यांना एक नवीन आयडी तयार करावी लागणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता अपार आयडीची अट लावून देण्यात आली आहे.
बोर्डाने विद्यार्थ्यांना डिजिलॉकरमध्ये त्यांची गुणपत्रिका उपलब्ध व्हावी यासाठी अपार आयडी (APAAR ID) तयार करणे आवश्यक आहे. यासंदर्भात बोर्डाचे सचिव दीपक माळी यांनी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
केंद्र सरकारने राष्ट्रीय डिजिटल एज्युकेशन धोरणाचा भाग म्हणून देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला एक अद्वितीय अपार आयडी तयार करून देण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले होते.
गेली दोन वर्षे महाराष्ट्रातील शाळांमध्ये हे काम सुरू असून आता परीक्षा प्रक्रिया डिजिटल करण्यासाठी त्याचे महत्त्व वाढले आहे. अपार आयडी तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक माहिती एका ठिकाणी केंद्रीकृत स्वरूपात उपलब्ध होते.
त्यामुळे दहावी-बारावीच्या गुणपत्रिका डिजिलॉकरमध्ये स्वयंचलितरीत्या उपलब्ध होतील. राज्य मंडळाने सांगितले की, डिजिलॉकरमधील कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्डमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे.
त्यांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सादर करण्याची गरज नसणार आहे. सर्व माहिती डिजिलॉकरमार्फत त्वरित पडताळता येत असल्याने प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद होणार आहे.
तसेच शासकीय शिष्यवृत्ती व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घेणेही अधिक सोयीस्कर होईल. डिजिटल रेकॉर्ड सुरक्षित असल्याने कागदपत्रे हरवण्याचा धोका कमी होतो. विद्यार्थ्यांना देशभरात कुठूनही आपली शैक्षणिक नोंद पाहता येते.
हाच डिजिटल बदल सक्षम करण्यासाठी मंडळाने सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करून त्याची नोंद राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, संबंधित संस्थांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे.
आगामी परीक्षांच्या दृष्टीने हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून विद्यार्थ्यांच्या डिजिलॉकर गुणपत्रिका वितरण प्रणालीला वेग देणार आहे. राज्य मंडळाच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या अधिक सोईस्कर आणि भविष्योन्मुख पायरीवर उभे राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.













