Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी महाराष्ट्रात सुरू झालेली लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लाभार्थी संख्या असणारी राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी १८ हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
पंधराशे रुपयांचा महिना या पद्धतीने हे १८ हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले जात आहेत. मात्र या योजनेत काही अनियमितता सुद्धा आढळून आल्या आहेत. अनेकांनी अपात्र असताना या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान अशा अपात्र लाभार्थ्यांवर सरकारकडून कारवाई करण्यात येत असून या योजनेतून अपात्र लाभार्थ्यांना वगळले जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी आता केवायसीची प्रक्रिया बंधनकारक केली आहे.
मात्र या योजनेच्या बहुतांशी लाभार्थी खेडेगावातून येतात. यातील अनेक लाभार्थी अशिक्षित आहेत आणि साहजिकच केवायसी प्रक्रिया करताना त्यांच्याकडून चुकीची माहिती भरली गेली आहे.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून केवायसी करताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी लाडक्या बहिणींना एकदा संधी देण्यात यावी अशी आग्रही मागणी उपस्थित करण्यात आली होती आणि याच आग्रही मागणीच्या पार्श्वभूमीवर अखेरकार फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना केवायसी प्रक्रियेतील चूक दुरुस्त करण्यासाठी एकदा संधी देण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातील माहिती पोस्ट केली आहे.
आदिती तटकरे यांनी काय सांगितले?
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत.
सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे.
या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे.
केवायसी साठी किती दिवसांची मुदत?
लाडक्या बहिणींना केवायसी साठी या महिना अखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीला १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत होती मात्र या मुदतीत सर्वच लाभार्थ्यांची केवायसी होणार नाही असे चित्र तयार झाले आणि यामुळे सरकारने ३१ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ दिली.
मात्र या महिन्याअखेरची मुदत ही शेवटची मुदत राहणार आहे. यामुळे मुदतीत महिलांनी केवायसी करून घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.













