Share Market Vs Gold : 2025 वर्षे आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या सतरा अठरा दिवसात नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. हे वर्ष शेअर मार्केट साठी मोठे चढ उताराचे राहिले आहे. वर्ष सरत असताना आता शेअर मार्केटमध्ये तेजी दिसत आहे यामुळे गुंतवणूकदार उत्साही आहेत पण या वर्षातून शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना अपेक्षित रिटर्न मिळालेले नाहीत.
अमेरिकेचे टॅरिफ धोरण, रुपयाची घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांचे विक्रीचे धोरण यामुळे शेअर मार्केटमध्ये यावर्षी सातत्याने घसरण होत राहिली आणि ही गुंतवणूकदारांसाठी एक चिंतेची बाब ठरली आहे. दुसरीकडे शेअर मार्केटच्या तुलनेत सोने आणि चांदी मधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळाले आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीने यावर्षी मोठमोठे रेकॉर्ड सेट केले आहेत.

2025 मध्ये आत्तापर्यंत वायदा बाजारात सोन्याने गुंतवणूकदारांना 71% चे जबरदस्त रिटर्न दिले आहेत आणि त्याच वेळी चांदीने यावर्षी आतापर्यंत 121 ते 122 टक्क्यांचे रिटर्न देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अशा या स्थितीत अनेक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून पुढील वर्षी काय होणार हा सवाल उपस्थित होतोय.
2026 मध्ये शेअर मार्केट मधून चांगले रिटर्न मिळणार की सोने चांदी मधून असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे आणि याबाबत आज आपण तज्ञ लोकांचे मत काय आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आघाडीची ब्रोकरेज फर्म कोटक सेक्युरिटीज ने 2026 मध्ये शेअर मार्केट मधून चांगले रिटर्न मिळणार की सोने चांदी मधून यासंदर्भात एक नवा अहवाल जारी केला आहे.
कुठून मिळणार जास्त रिटर्न?
सप्टेंबर 2024 मध्ये शेअर मार्केटमध्ये एक मोठा उच्चांक पाहायला मिळाला होता. मात्र यानंतर शेअर मार्केटमध्ये 17 टक्के घसरण झाली आणि जी गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा ठरली. आता 2025 वर्ष सरत असताना निफ्टी 50 मध्ये पुन्हा एक ऑल टाईम हाय पाहायला मिळाला आहे.
मात्र मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये सुरू असणारी घसरण कायम राहिली आहे. पण लार्ज कॅप शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजीचे वातावरण आहे. यंदा बँकिंग आणि मेटल कंपन्यांमध्ये तेजी दिसली.
त्याचवेळी आयटी आणि एफएमसीजी कंपन्यांमध्ये मोठा दबाव पाहायला मिळाला. दुसरीकडे यावर्षी परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचे सत्र सुरू राहिले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मार्केटला चांगला आधार दिला आहे. भारतीय शेअर मार्केटबाबत आगामी काळासाठी सकारात्मक चित्र दिसत आहे.
निफ्टी निर्देशांक लॉन्ग टर्मसाठी मजबूत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता नव्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2027 मध्ये निफ्टीच्या नफ्यात 17.6 टक्के, तर आर्थिक वर्ष 2028 मध्ये 14.8 टक्के वाढ अपेक्षित आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत निफ्टी 29,120 अंकांपर्यंत पोहोचू शकतो. आर्थिक वर्ष 2028 साठी प्रति शेअर नफा (EPS) 1,456 रुपये आणि Price-to-Earnings (P/E) रेशो 20 गृहित धरून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शिवाय बुल केसमध्ये निफ्टी 32,032 अंकांपर्यंत झेप घेऊ शकतो, तर जागतिक किंवा देशांतर्गत प्रतिकूल परिस्थितीत बियर केसमध्ये तो 26,208 अंकांपर्यंत घसरू शकतो. 2026 साठी बँकिंग व वित्तीय सेवा (BFSI), टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी हे ‘हॉट सेक्टर्स’ ठरू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
दरम्यान, सोन्या-चांदीनेही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये 55 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून भारतात वायदा बाजारात सुमारे 71 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. चांदीने तर 121 टक्क्यांची झेप घेतली आहे.
कोटक सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ श्रीपाल शाह यांनी जागतिक आव्हाने असूनही भारतीय इक्विटीबाबत सकारात्मक भूमिका कायम असल्याचे सांगितले. सोने 2026 मध्येही सुरक्षित गुंतवणूक पर्याय राहील, तसेच तरुण गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग बाजाराला नवे बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.













