Toll Tax Rule : कुठे लांब प्रवासाला जायचे असल्यास आपण त्या प्रवासादरम्यान आपल्याला किती टोल भरावा लागणार ? हे नक्कीच तपासतो. खरंतर देशभरात हजारो टोलनाके कार्यान्वित आहेत. अलीकडील काही वर्षांमध्ये देशात अनेक मोठमोठ्या महामार्गांची निर्मिती झाली आहे आणि या महामार्गांवर Toll प्लाझा सुद्धा तयार करण्यात आले आहेत.
महामार्गांसाठी झालेला हजारो कोटी रुपयांचा खर्च भरून काढण्यासाठी टोल प्लाजा तयार करण्यात आले आहेत. महामार्गांवरून प्रवास करताना आपल्याला ठराविक रक्कम टॅक्स म्हणून द्यावी लागते.

पण, काही लोकांना टोल टॅक्स मधून सवलत दिली जाते. घराजवळ टोल प्लाजा असेल तर अशा नागरिकांना सुद्धा टोल टॅक्स मध्ये सवलत मिळते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)च्या नियमांनुसार, आता टोल प्लाझाच्या २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्या टोलवरून मोफत प्रवास करता येणार आहे.
त्यामुळे घराजवळील टोल प्लाझावर वाहनचालकांना दररोज टोल भरण्याची गरज भासणार नाही.देशभरात लाखो वाहने दररोज राष्ट्रीय महामार्गांवरून ये-जा करतात. अनेक नागरिकांचे घर टोल प्लाझाच्या अगदी जवळ असल्याने त्यांना कमी अंतरासाठीही टोल भरावा लागत होता.
यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी होती. हीच बाब लक्षात घेऊन NHAIने हा नियम लागू केला असून, टोल प्लाझाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. NHAIच्या नियमानुसार, एखाद्या वाहनधारकाचे घर टोल प्लाझाच्या २० किलोमीटरच्या परिघात येत असल्यास त्या वाहनधारकाला टोल माफ करण्यात येतो.
मात्र, यासाठी संबंधित व्यक्तीकडे वैध पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, वीजबिल, रेशन कार्ड किंवा तत्सम शासकीय दस्तऐवज पत्त्याच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरले जातात. या टोल माफीचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकाने जवळच्या टोल प्लाझावर जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
पत्त्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वाहनधारकाला ‘लोकल पास’ दिला जातो. हा पास मिळाल्यानंतर त्या वाहनधारकाला दररोज प्रवास करताना टोल भरावा लागत नाही, त्यामुळे वेळ आणि पैशांची दोन्ही बचत होते.
दरम्यान, स्थानिक रहिवाशांव्यतिरिक्त काही विशिष्ट वाहनांनाही टोलमधून सूट देण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारची अधिकृत वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल तसेच आपत्ती निवारण कार्यात गुंतलेल्या एनडीआरएफच्या वाहनांना टोल माफीचा लाभ दिला जातो.
या निर्णयामुळे टोल प्लाझाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार असून, रोजच्या प्रवासावरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













