SBI FD News : SBI देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक एफडी करणाऱ्यांना चांगले व्याज देते. खरेतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यावर्षी रेपो दरात एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली आहे.
डिसेंबर महिन्यातही आरबीआयनं रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केल्याने सध्या रेपो दर ५.२५ टक्क्यांवर आला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम बँकांच्या कर्ज आणि ठेवींच्या व्याजदरांवर झाला असून अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) देखील काही निवडक मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. मात्र, यामध्येही काही विशिष्ट कालावधीच्या एफडी योजना अशा आहेत, ज्या आजही गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि आकर्षक परतावा देत आहेत.
एसबीआयमध्ये ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत विविध कालावधीसाठी एफडी खाते उघडता येते. सध्या एसबीआय एफडीवर ३.०५ टक्क्यांपासून ते ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. विशेष म्हणजे, ४४४ दिवसांच्या ‘अमृत वृष्टी स्पेशल एफडी स्कीम’वर सामान्य नागरिकांना ६.४५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ६.९५ टक्के इतका आकर्षक व्याजदर दिला जात आहे.
तसेच, एसबीआयची ५ वर्षांची एफडी योजना ही दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी लोकप्रिय मानली जाते. या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना ६.०५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.०५ टक्के व्याजदराचा लाभ दिला जात आहे.
जर एखादा सामान्य नागरिक (वय ६० वर्षांखालील) एसबीआयमध्ये ५ वर्षांसाठी २ लाख रुपये एफडीमध्ये गुंतवतो, तर मॅच्युरिटीवर त्याला एकूण २,७०,०३५ रुपये मिळतात. यामध्ये ७०,०३५ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे.
त्याचप्रमाणे, जर एखादा ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक) ५ वर्षांसाठी २ लाख रुपयांची एफडी करतो, तर मॅच्युरिटीवर त्याला एकूण २,८३,६५२ रुपये मिळतात. यामध्ये तब्बल ८३,६५२ रुपयांचे हमीचे व्याज मिळते.
रेपो दरात कपात होत असतानाही एसबीआयच्या या एफडी योजना सुरक्षित, स्थिर आणि खात्रीशीर परताव्यामुळे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरत आहेत.













