Banking News : मागील काही महिन्यांपासून देशभरात बँक विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना, बँकिंग क्षेत्रात एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड घडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुजरातमधील चार प्रमुख सहकारी बँकांच्या विलीनीकरणाला अंतिम मान्यता दिली आहे.
ही अधिसूचना १५ डिसेंबर २०२५ पासून लागू झाली असून, या निर्णयामुळे आता चार बँका एकत्र येऊन दोन मजबूत सहकारी बँकांच्या स्वरूपात कार्यरत राहणार आहेत.

RBI ने स्पष्ट केले आहे की हे विलीनीकरण बँकिंग नियमन कायदा, १९४९ मधील तरतुदींनुसार करण्यात आले असून, संबंधित बँकांच्या परस्पर संमतीने म्हणजेच स्वेच्छेने हे विलीनीकरण करण्यात आले आहे.
या निर्णयामागील मुख्य उद्देश गुजरातच्या सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह बनवणे हा आहे.
पहिल्या विलीनीकरणात अहमदाबाद येथील द आमोद नागरीक सहकारी बँक ही द भुज मर्कंटाईल सहकारी बँकेत विलीन झाली आहे.
या विलीनीकरणानंतर द आमोद नागरीक सहकारी बँकेच्या सर्व शाखा आता द भुज मर्कंटाईल सहकारी बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत राहतील. हे विलीनीकरण बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ४४अ अंतर्गत करण्यात आले आहे.
दुसऱ्या महत्त्वाच्या विलीनीकरणात अमरनाथ सहकारी बँक ही कालूपूर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीन झाली आहे. यानंतर अमरनाथ सहकारी बँकेच्या सर्व शाखा कालूपूर कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांमध्ये रूपांतरित होतील.
दरम्यान, या विलीनीकरणामुळे ग्राहकांच्या ठेवींवर कोणताही परिणाम होणार नाही, असा स्पष्ट दिलासा RBI ने दिला आहे. खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असून, बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच अखंडितपणे सुरू राहतील,
असेही RBI ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही घाबरट प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नसल्याचे बँकिंग तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
या विलीनीकरणामुळे सहकारी बँकांची आर्थिक क्षमता वाढून, ग्राहकांना अधिक चांगल्या आणि आधुनिक बँकिंग सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













