Successful Farmer : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा फारच आव्हानात्मक झाला आहे. नैसर्गिक संकटांमुळे तसेच सुलतानी जुलामशाहीमुळे शेतीचा व्यवसाय परवडत नाही ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा शेतकरी बांधव शेतीमधून करोडपती होऊ शकतात.
आपल्याला अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात आणि आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. अवघ्या 65 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून हा शेतकरी चक्क 10 कोटी रुपयांचा मालक झाला आहे.

या शेतकऱ्याने 200 झाडांच्या शेतीमधून दहा कोटी रुपये कमाई काढली आहे आणि म्हणूनच या शेतकऱ्याची यशोगाथा सध्या संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. मंडळी आता पारंपारिक शेती सोबतच आधुनिक पद्धतीने शेती करणे काळाची गरज बनली आहे.
वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि हवामानातील सततचे बदल यामुळे शेतीमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. पारंपारिक शेती केली तर शेतकऱ्यांना नक्कीच उत्पादन खर्च सुद्धा काढता येत नाही आणि त्यामुळे अनेक शेतकरी पुत्र आता शेती ऐवजी इतर उद्योगधंद्यांकडे किंवा नोकरीकडे वळताना दिसतात.
पण काही शेतकरी शेतीपासून दूर जात असताना, काही जिद्दी शेतकरी मात्र पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा विचार करून नवे प्रयोग करत करोडो रुपयांची कमाई मिळवत आहेत. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात पण एका शेतकऱ्याने पारंपारिक शेती ऐवजी आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेती कशी फायदेशीर ठरू शकते हे सिद्ध करून दाखवले आहे.
सलेमपूर कला गावातील शेतकरी रूप सिंग वैष्णव यांनी पांढऱ्या चंदनाच्या शेतीतून तब्बल दहा कोटी रुपयांची कमाई काढली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी फक्त 60-70 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे.
अर्थात 70 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा शेतकरी चक्क करोडपती झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 14 वर्षांपूर्वी रूप सिंग वैष्णव यांनी एक धाडसी निर्णय घेतला.
त्यांच्या गावातील हरभजनसिंग नावाच्या संतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कर्नाटकातून पांढऱ्या चंदनाची रोपे मागवली. त्या काळात ही कल्पना अनेकांना धाडसी आणि जोखमीची वाटत होती. मात्र, भविष्यातील संधी ओळखून त्यांनी सुमारे 65 ते 70 हजार रुपये गुंतवून 500 पांढऱ्या चंदनाची रोपे खरेदी केली.
ही रोपे त्यांनी जवळपास दोन हेक्टर जमिनीवर लावली. सुरुवातीच्या काळात हवामान, जमिनीचा प्रकार आणि देखभालीतील अडचणींमुळे सर्व रोपे टिकू शकली नाहीत. अखेर 500 पैकी सुमारे 200 झाडेच चांगली वाढली.
पांढऱ्या चंदनाची लागवड ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. या झाडांना पूर्णतः तयार होण्यासाठी 14 ते 15 वर्षांचा कालावधी लागतो. आज या 200 झाडांनी शेतकऱ्याचे भविष्य बदलले आहे.
सध्या एका पांढऱ्या चंदनाच्या झाडाची बाजारभावानुसार किंमत 5 ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या हिशोबाने रूप सिंग वैष्णव यांच्या शेतातील चंदनाची एकूण किंमत 10 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.
पांढऱ्या चंदनाच्या लाकडाला धार्मिक पूजाविधी, आयुर्वेदिक औषधे, सुगंधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात मोठी मागणी आहे. त्यामुळे भविष्यातही या पिकाला चांगला बाजार मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
रूप सिंग वैष्णव यांचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, योग्य नियोजन आणि संयम असल्यास शेतीतूनही कोट्यवधींची कमाई शक्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.













