Maharashtra National Highway : देशातील एका महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना कनेक्ट करणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता.
मात्र आता हा विषय निकाली निघण्याची शक्यता आहे. भूसंपादन रखडल्याने या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत नव्हते पण आता भूसंपादनाचा विषय जवळपास मार्गी लागला आहे आणि प्रशासनाला भूसंपादनात मोठे यश मिळाले आहेत. प्रशासनाने स्थानिक जमीन मालकांची समजूत काढली असून यामुळे या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा विषय आता निकाली निघेल असा विश्वास व्यक्त होतोय.

महाराष्ट्रातील खानदेशी भागातील तीन जिल्ह्यांना हा महामार्ग जोडतो. खानदेशातील नंदुरबार , धुळे आणि जळगावसह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या (एनएच-७५३ बी) चौपदरीकरणाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खरे तर हा महामार्ग महाराष्ट्रातील १५३ गावांमधून जातो.
यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झाल्यास यासंबंधीत गावातील एकात्मिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातीलही बऱ्याचशा गावांमधून हा महामार्ग जात असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे.
या रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. खरंतर या महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे हे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते.
पण, आता प्रशासनाने शेतकरी आणि स्थानिक जमीन मालकांनी दाखल केलेल्या हरकतींवर तोडगा काढला आहे. शासनाला बाधित जमीन मालकांच्या समस्या सोडवण्यात यश आल्याने आता भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पुढे सरकणार अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.
या राष्ट्रीय महामार्गाच्या रूट बाबत बोलायचं झालं तर याची सुरुवात मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून होते. मध्यप्रदेशातून हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार मध्ये येतो. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तसेच पुढे हा मार्ग गुजरातमधील अंकलेश्वरपर्यंत जातो.
म्हणजेच या राष्ट्रीय महामार्गाचा बहुतांशी भाग हा आपल्या महाराष्ट्रातला आहे. यामुळे गुजरात आणि मध्यप्रदेश पेक्षा या महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी उपस्थित केली जाते. या महामार्ग प्रकल्पामुळे गुजरात मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.
गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी शिक्षण उद्योग पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना मोठा लाभ मिळणार आहे.
यामुळे मागास राहिलेले भाग जलद गतीने विकसित होतील अशी आशा आहे. वास्तविक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनींच्या संपादनाची अधिसूचना यापूर्वीच जारी केली आहे. या अधिसूचनेत कोणत्या गावांमध्ये संपादन होणार याची माहिती आहे.
किती गावांमध्ये होणार जमिनीचे संपादन
त्यामध्ये गुजरातमधील सात गावे, महाराष्ट्रातील तळोदा तालुक्यातील १०, शहादा तालुक्यातील २८, शिरपूर तालुक्यातील ४०, चोपडा तालुक्यातील २४, यावल तालुक्यातील २३, रावेर तालुक्यातील २३, मुक्ताईनगर तालुक्यातील पाच आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी व नागरिकांच्या हरकती निकाली निघाल्याने आता प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळणार आहे.
यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होणार आहे. या संदर्भात भूमी संपादन अधिनियम २०१३ च्या कलम ३(अ) अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, यावल तालुक्यातील फैजपूर विभागातील उपविभागीय तथा भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा ते बऱ्हाणपूर महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी यावल, फैजपूर, चिंचोली, कासारखेडे, डोणगाव, किनगाव खुर्द-बुद्रुक, गिरडगाव, वाघोदे, साकळी, वढोदे, शिरसाड, विरावली बुद्रुक, चितोडा, सांगवी बुद्रुक, हिंगोणे व हंबर्डी या गावांतील जमिनी संपादित केल्या जात आहेत.
या जमिनींवर कोणतेही नवीन बांधकाम, झाडतोड किंवा मालकी हक्कातील बदल करण्यास मनाई करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत जमीनधारकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.













