Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात रेल्वेचे असंख्य प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि अजूनही काही मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. दरम्यान आता राज्यात आणखी एका नव्या आणि अगदीच भव्य अशा रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
महाराष्ट्राला एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार असून यामुळे राज्यातील काही जिल्हे थेट कनेक्ट होणार आहेत. तुम्ही खानदेशातील असाल आणि रेल्वे हे तुमच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन असेल तर हा रेल्वे मार्ग तुमच्यासाठी उपयोगाचा ठरणार आहे.

खानदेशातील जळगाव आणि धुळे हे दोन जिल्हे एकमेकांना थेट रेल्वेने जोडण्यासाठी आता एक नवा रेल्वे मार्ग विकसित होणार असून या प्रकल्पाचा खानदेशातील एकात्मिक विकासाला मोठा लाभ मिळणार अशी आशा खानदेशातील जाणकार मंडळी कडून व्यक्त केले जात आहे.
खानदेश म्हणजेच नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यांचा प्रदेश. या खानदेशातील दोन महत्त्वाचे जिल्हे जळगाव आणि धुळे सध्या राष्ट्रीय महामार्गाने थेट जोडले गेलेले आहेत पण आत्तापर्यंत ही दोन शहरे थेट रेल्वेने जोडलेली नाहीत.
यामुळे जर या दोन शहरांदरम्यान प्रवास करायचा असल्यास अनेक जण रस्ते मार्गाने प्रवास करतात तसेच जर प्रवाशांना रेल्वे मार्गाने प्रवास करायचा असेल तर त्यांना चाळीसगाव मार्गे विळखा घेऊन जावे लागते.
यामुळे जळगाव ते धुळे असा थेट रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी मागणी या दोन जिल्ह्यांमधील नागरिकांकडून सातत्याने उपस्थित होते आणि आता त्यांची ही मागणी एका भव्य रेल्वे प्रकल्पाच्या निमित्ताने पूर्ण होताना दिसत आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की केंद्र सरकारने मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली असून या रेल्वे मार्गामुळे जळगाव ते धुळे या दरम्यान थेट रेल्वेची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. मनमाड धुळे इंदूर हा एकूण 309 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असून या प्रकल्पामुळे जळगाव ते धुळे हा रेल्वे प्रवास वेगवान होणार आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे कारण की हा केंद्रातील मोदी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 18 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांतील जमिनींचे संपादन सुरू झाले आहे.
या मार्गामुळे सुमारे एक हजार गावे जोडली जाणार असून, तब्बल 30 लाख लोकसंख्येला त्याचा थेट लाभ होणार आहे. प्रस्तावित मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-उधना मार्गाला नरडाणा स्थानकावर छेदणार आहे.
त्यामुळे नरडाणा येथे रेल्वे चौफुली निर्माण होणार असून, येथून उधना, जळगाव, धुळे तसेच शिरपूर-इंदूरकडे जाण्याचे पर्याय उपलब्ध होतील. सध्या जळगाव-धुळे दरम्यान थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांना जळगावहून चाळीसगावला उतरून तेथून धुळे गाठावे लागते.
या प्रवासात सुमारे 150 किलोमीटर अंतर आणि अडीच तासांहून अधिक वेळ लागतो. शिवाय चाळीसगाव-धुळे मार्गावरील रेल्वे गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यामुळे बहुतांश प्रवासी रस्तेमार्गे प्रवास करण्यास प्राधान्य देतात; मात्र वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि वाढलेला खर्च ही मोठी समस्या ठरते. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर नरडाणा ते धुळे अंतर अवघे 35 किलोमीटर राहणार आहे.
त्यामुळे जळगावहून धरणगाव, अमळनेर, नरडाणामार्गे धुळे जाणे अधिक सोपे, स्वस्त आणि सुरक्षित होणार आहे. भविष्यात नरडाणा स्थानकाजवळून जळगाव-धुळे थेट रेल्वेसाठी वळण मार्ग विकसित झाल्यास खान्देशातील प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













