विजयाच्या सभेतून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत निर्देश देत शहरातील वर्षभर साचलेली घाण तातडीने दूर करण्याचे आदेश दिले. त्याच दिवशी सायंकाळी आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन कामाचा आराखडा ठरवला. या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने रात्रीच युद्धपातळीवर काम सुरू केले.
पालिका अधिकारी-कर्मचारी एकत्र येत शहरातील मुख्य लक्ष्मी रोडची मध्यरात्रीच साफसफाई करण्यात आली. डिव्हायडरलगत साचलेली माती व कचरा हटवून पाण्याने संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आला. पहिल्याच दिवशी नगरसेवकही मैदानात उतरले. बसस्थानक परिसरातील दत्त महाराजांची आरती करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. “पालिकेवर थोरात-तांबे नेतृत्व आले आणि शहरात बदल जाणवू लागला,” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड आदींसह सर्वच नगरसेवक बसस्थानक परिसरात उपस्थित होते.

गेल्या चार वर्षांत प्रशासक राजवट आणि त्यानंतरच्या राजकीय अस्थिरतेमुळे शहराची अवस्था ढासळली होती. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत “संगमनेर 2.0” हे व्हिजन प्रभावीपणे मांडण्यात आले. स्वच्छता, मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडरची दुरवस्था, अनधिकृत फ्लेक्स यांसारखे मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरले. विजयसभेत बाळासाहेब थोरात यांनी दंड थोपटण्याऐवजी कामाला लागण्याचा ठाम संदेश दिला, घाण धुवून काढायची, अनधिकृत फ्लेक्स हटवायचे आणि शहर स्वच्छ, नीटनेटके करायचे.
या भूमिकेला पुढे नेत आमदार सत्यजित तांबे यांनी निकालाच्याच दिवशी नगरसेवकांची बैठक घेत “पहिले 100 दिवस” आणि “संगमनेर 2.0” अंतर्गत करावयाच्या कामांवर चर्चा केली. ही सत्ता जनसेवेसाठी आहे; प्रत्येक नागरिकाला बदल जाणवला पाहिजे, शहरविकास सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, पालिका प्रशासनानेही सकारात्मक पावले उचलत रात्रीच स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. मुख्य रस्त्यावरील माती-कचरा हटवून अग्निशमन पथकाच्या सहाय्याने रस्ता धुवून स्वच्छ करण्यात आला. या कामात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाने सहकार्य केले.
बसस्थानक परिसर व मुख्य रस्ता फ्लेक्समुक्त
विजयानंतर मिरवणूक झाली असली, तरी सभेत दिलेल्या सूचनांनुसार मध्यरात्रीच अतिक्रमणविरोधी पथकाने अनधिकृत फ्लेक्स हटवले. त्यात नगरसेवकांच्या अभिनंदनाचे फ्लेक्सही होते; सर्वांनी पालिकेला सहकार्य केले.
नगरसेवकांकडून बसस्थानकात स्वच्छता मोहीम
शहराचा अभिमान असलेला बसस्थानक परिसर आणि समोरील रस्ता स्वच्छतेअभावी विद्रूप झाला होता. ठिकठिकाणी माती साचली होती, काही ठिकाणी झाडे वाढली होती. दुर्गाताई तांबे यांच्यासह नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पुढाकार घेत या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून बदलाची सुरुवात केली.