Pan Card सुद्धा एक्स्पायर होत का ? काय सांगतात पॅन कार्डचे नियम ? वाचा सविस्तर

Published on -

 

Pan Card Expiry Date : भारतात आधार कार्ड जसे गरजेचे आहे तसेच पॅन कार्ड सुद्धा गरजेचे आहे. पॅन कार्ड विना आपल्या देशात कोणतेच वित्तीय कामकाज होऊ शकत नाही. शासकीय तसेच निमशासकीय कामांमध्ये आणि बँकिंग कामांमध्ये पॅन कार्डचा वापर अनिवार्य असतो. शासकीय योजनांच्या लाभासाठी देखील पॅन कार्ड आवश्यक बनवण्यात आले आहे. भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड एक आवश्यक डॉक्युमेंट असून आज आपण याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आयकर रिटर्न भरणे, बँक अकाउंट ओपन करणे, डिमॅट अकाउंट ओपन करणे, केवायसी करणे, मर्यादेपेक्षा जास्त सोने खरेदी करणे, मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढणे अशा वेगवेगळ्या कामांसाठी पॅन कार्डचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मग हे महत्त्वाचे वित्तीय डॉक्युमेंट एक्सपायर झाले तर…. पण पॅन कार्ड खरंच एक्सपायर होतं का? याबाबत आयकर विभागाचे नियम काय सांगतात? याविषयी आज आपण या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पॅन कार्ड Expire होत का?

पॅन कार्ड खरच एक्सपायर होतं का? हा प्रश्न उपस्थित होण्यामागे काही कारणे आहेत. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पॅन कार्डच्या वैधतेबाबत मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण करणारी माहिती व्हायरल होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. “पॅन कार्डची वैधता संपत आहे”,

“पॅन कार्ड नूतनीकरण करा, अन्यथा ते रद्द होईल” अशा स्वरूपाचे मेसेज आणि कॉल नागरिकांना त्रास देत आहेत. ज्यांना पॅन कार्ड बाबत पुरेशी माहिती आहे त्यांना अशा कॉल्समुळे काय टेन्शन येत नाही पण सर्वसामान्य नागरिक ज्यांना अजून या नियमांची माहिती नाही ते यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाल्याचे दिसत आहेत.

पण सध्या सोशल मीडियावर जी माहिती व्हायरल होत आहे, ती पूर्णपणे दिशाभूल करणारी असून नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पॅन कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा ओळख दस्तऐवज असून तो एकदा जारी केल्यानंतर आयुष्यभर वैध राहतो. म्हणजे एकदा पॅन कार्ड काढले की त्याला काहीच करावे लागत नाही.

माणूस हयात असेपर्यंत तो त्याने काढलेले पॅन कार्ड वापरू शकतो. पॅन कार्डसाठी कोणत्याही प्रकारचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता नसते. पॅन कार्ड केवळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच अधिकृतरीत्या रद्द केले जाऊ शकते. त्यामुळे पॅन कार्ड एक्सपायर होते किंवा त्याची वैधता संपते, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. सायबर घोटाळेबाजांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी अशा प्रकारचे कॉल आणि मेसेज पाठवले जात आहेत. “पॅन अपडेट करा”, “केवायसी पूर्ण करा” अशा नावाखाली बँक खाते, ओटीपी, कार्ड डिटेल्स मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

त्यामुळे अशा कोणत्याही कॉल, लिंक किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. दरम्यान, पॅन कार्डमध्ये असलेला १० अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक हा कायमस्वरूपी असतो. तो कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही. पॅन कार्डवरील नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो किंवा सही यामध्ये बदल करता येतो; मात्र पॅन क्रमांक एकदाच दिला जातो आणि तो आयुष्यभर तोच राहतो. आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३९अ नुसार, एका व्यक्तीकडे फक्त एकच पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे.

आधीच पॅन कार्ड असताना नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणे हा कायद्याचा भंग मानला जातो. अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीवर १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. म्हणून नागरिकांनी केवळ आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा आणि अफवांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News